मुंबई, 11 मे : अलिकडे कोविड रुग्णांमध्ये (Covid Patient) डायरियाचं (Diarrhea) लक्षण मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. तसंच रुग्णांच्या विष्ठेतही कोरोनाव्हायरस आढळलेला आहे. त्यामुळे तुम्ही राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये एखादा कोरोना रुग्ण असेल, तुम्ही त्याच्या संपर्कात नाही आलात पण त्याने वापरलेल्या टॉयलेटमार्फत कोरोनाव्हायरस (Coronavirus transmitted through toilet) तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो का? असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या वर्षी शास्त्रज्ञ सांगत होते, की कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार स्प्रेबॉटलमधून निघणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्याप्रमाणे असतो. आता नव्या संशोधनानुसार शास्त्रज्ञ सांगत आहेत, की हा विषाणू डिओच्या फवाऱ्याप्रमाणे पसरतो. याचा अर्थ काय? तर, पूर्वी शास्त्रज्ञांना असं वाटत होतं, की संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून ड्रॉपलेटच्या रूपात बाहेर आलेला विषाणू पाण्याच्या फवाऱ्याप्रमाणे थोड्या अंतरापर्यंतच पसरला जायचा. आता शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे,की विषाणू जेव्हा ड्रॉपलेटमधून बाहेर येतो, तेव्हा तो एखाद्या डिओप्रमाणे पसरतो. म्हणजे काय? तर डिओचे थेंब पाण्याप्रमाणेच थोड्या अंतरापर्यंतच जातात. पण डिओचा वास मात्र अख्ख्या खोलीत पसरतो. तसंच विषाणूही एखाद्या विशिष्ट जागेपुरता मर्यादित राहत नाही तर तो संपूर्ण खोलीत पसरू शकतो. अद्याप या गोष्टीचे पुरावे मिळालेले नाहीत. मात्र यामुळे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसंच विषाणू शौचालयाच्या माध्यमातूनही पसरू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. रेस्टॉरंट किंवा ऑफिसमधल्या शौचालयाचा विचार केला, तर याबद्दलच्या धोक्याचा विचार करता येईल. त्यातून फैलावलेल्या कणांमुळे अपार्टमेंटमधल्या व्यक्तींना धोका असू शकतो का? हे वाचा - Virafin : कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार औषध; Zydus cadila ने जारी केली किंमत विष्ठेत विषाणू जिवंत राहत असेल आणि अधिक संसर्गक्षम झाला, तर रुग्णाची विष्ठा वाहून गेल्यावर त्याचा काय परिणाम होईल? हार्वर्ड विद्यापीठाच्या हेल्दी बिल्डिंग प्रोग्रामचे संचालक जोसेफ जी. एलेन सांगतात, ‘शौचालयात विष्ठा गेल्यानंतर 10 लाख अतिरिक्त कण प्रति घनमीटर हवेत येतात. हे सगळेच विषाणू नसतात.’ आधीचा अनुभव काय? 2003 मध्ये सार्सची (SARS) महासाथ आली तेव्हा असं एक प्रकरण पुढे आलं होतं. हाँगकाँगमध्ये 50 मजल्यांची एक निवासी इमारत आहे. या इमारतीतल्या एका कुटुंबाला सार्सची लागण झाली. त्यानंतर याच इमारतीतल्या 321 जणांना सार्स झाला. त्यापैकी 42 जणांचे प्राण गेले. शास्त्रज्ञांच्या मते, इमारतीतल्या प्लम्बिंग सिस्टीमद्वारे हा विषाणू पसरला असावा. 2003 मध्ये एमॉय गार्डन या इमारतीत एक सार्स रुग्ण आला. तो इमारतीच्या मधल्या मजल्यावर ज्यांच्याकडे गेला होता, त्यांच्याकडे त्याने शौचालयाचा वापर केला. त्याला डायरिया झाला होता. त्यामुळे त्याने दोन वेळा शौचालय वापरलं. त्यानंतर त्या इमारतीत सार्सच्या रुग्णांची संख्या वाढत गेली. संशोधन काय सांगतं? ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातल्या माहितीनुसार, 187 पैकी 99 रुग्ण त्याच इमारतीतले होते जिथल्या शौचालयाचा (Toilet) वापर पहिल्यांदा सार्स रुग्णाने केला होता. त्यातली एक आश्चर्यकारक गोष्ट अशी, की जे लोक आजारी पडले, ते सगळे त्या शौचालयाच्या वरच्या मजल्यावर राहत होते. तसंच इमारतीचं व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था पाहणारे कर्मचारी 24 तास तळमजल्यावर असायचे. त्यांच्यापैकी कोणालाच काही झालं नाही. हे वाचा - कोरोना नियंत्रण कसं करायचं मुंबई, पुण्याकडून शिका; मोदी सरकारने केलं कौतुक अशाच प्रकारचं एक प्रकरण चीनच्या (China) ग्वांगझाऊमध्ये असलेल्या एका उंच इमारतीत पाहायला मिळालं. त्या इमारतीत 15 व्या मजल्यावर राहणारं एक कुटुंब वुहानमधून परतल्यावर त्यांना कोविड झाला. त्यानंतर काहीच दिवसांनी 25 व्या आणि 27 व्या मजल्यावरच्या काही जणांना कोरोना झाला. त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी, की हे लोक चीनमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडले नव्हते. मात्र 15 व्या मजल्याची पाइपलाइन त्यांच्या घरापर्यंत थेट जात होती. ही बाब अधिक स्पष्टपणे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 15 व्या मजल्याच्या सांडपाण्याच्या पाइपातून एक ट्रेसर गॅस सोडला. तो गॅस 25 व्या आणि 27 व्या मजल्यापर्यंत पोहोचल्याचं त्यांना आढळलं. थिअरी काय सांगते? शौचालयातला ड्रेन पाइप (Drain Pipe) यू आकाराचा असतो. तो पाण्याचा प्रवाह थांबवून त्यातून निघालेल्या वायूला घरात जाण्यापासून रोखतो. या यू आकाराच्या पाइपमध्ये जिथं पाणी थांबतं, तो भाग सुकतो आणि नंतर घरात सडलेल्या अंड्यांसारखी दुर्गंधी पसरते. 2003 मध्ये एमॉय गार्डन इमारतीत सार्सचे रुग्ण आढळले होते, तिथला ड्रेन पाइप सुकला होता, असं आढळलं. त्यामुळेच दुर्गंधी आणि विषाणू खालच्या मजल्यावरून आत घुसले होते. आता काय करता येऊ शकतं? काही साध्या-सोप्या गोष्टी केल्या, तर अशा प्रकारचा संसर्ग पसरण्यापासून वाचता येईल, असं शास्त्रज्ञ सांगतात. संडास/बाथरूममधल्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करू नका. पाइप लीक झाल्यामुळे तसं होऊ शकतं. फ्लश करताना कमोडचं झाकण बंद केलं पाहिजे. त्यामुळे एखाद्या घरात कोविडचा रुग्ण असेल, तर तिथून विषाणू शेजाऱ्यांच्या घरात जाणार नाही. टॉयलेटची वायुविजनाची खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवावा. बाथरूम/संडासमधील पृष्ठभाग सतत स्वच्छ ठेवले पाहिजेत. एकंदरीत पाहता स्वच्छता हीच महत्त्वाची गोष्ट आहे. हे वाचा - Salute! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णसेवा या सर्वाचा अर्थ असा नाही, की बाथरूमचा पाइप हा विषाणू पसरण्याचा मुख्य स्रोत आहे.आतापर्यंत असं मानलं जात आहे, की कोविड रुग्णाच्या विष्ठेतून विषाणू पसरू शकतो. ज्या कोविड रुग्णाच्या विष्ठेतून विषाणू पसरू शकतो, त्याच्या शरीरात विषाणूचं अस्तित्व मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. स्वच्छता आणि सावधानता या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे कायम लक्षात ठेवून वागलं पाहिजे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.