खूप वेळ एका जागी बसणं पडेल महागात
मुंबई, 14 डिसेंबर : लॉकडाउनमध्ये अनेक कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय सुरू झाला. आता लॉकडाउन संपलेलं आहे, तरीदेखील अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय सुरू ठेवला आहे. उभं राहणं किंवा फिरणं यापेक्षा बसण्यासाठी कमी ऊर्जा लागते. प्रदीर्घ काळ कम्प्युटर आणि लॅपटॉपवर काम केल्यामुळे अनेकांना शारीरिक समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यात लठ्ठपणा आणि मेटॅबॉलिझम सिंड्रोम, हाय ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, कमरेभोवती अतिरिक्त चरबी आणि हाय कोलेस्टेरॉल यांचा समावेश होतो. एकंदरीत जास्त काळ बसून काम केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग आणि कर्करोगाचा धोका वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कामं आणि बसण्याची वेळ या बाबतीत संशोधकांनी सुमारे 13 पेपर्सचा अभ्यास केला आहे. त्यांनी शोधून काढलं, की ज्या व्यक्ती दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसतात, त्यांना जास्त वजन आणि धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूइतकाच धोका असतो. म्हणजेच जास्त काळ एकाच जागी बसल्याने मृत्यूचा धोका वाढू शकतो. एक दशलक्षहून अधिक व्यक्तींच्या माहितीच्या आधारे केलेल्या अभ्यासात असं आढळलं आहे, की दररोज 60 ते 75 मिनिटांचा मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा शारीरिक व्यायाम केल्यास जास्त काळ बसण्याच्या नकारात्मक परिणामांचा सामना करता येऊ शकतो. “ज्या व्यक्ती जास्त काळ सक्रिय असतात त्यांना सतत बसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत मृत्यूचा धोका कमी असतो,” अशी माहिती गुरुग्राममधल्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. आर. आर. दत्ता यांनी दिली. हेही वाचा - Winter Tips : तुमच्या बाळाला ठेवा केमिकल्सपासून दूर, घरी बनवा हे 4 प्रकारचे मॉइश्चरायझर एकंदरीत, जास्त वेळ बसून काम केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग आणि कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका वाढलेला दिसतो. याउलट जास्त हालचाल केल्यास आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे तुमच्याकडे पर्याय असल्यास, बसण्याऐवजी जास्त हालचाल करून काम करण्याचा प्रयत्न करा. कामाचा व्याप सांभाळून व्यायाम कसा करता येईल, याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. डॉ. दत्ता म्हणतात, “हळुवार व्यायामाचादेखील लक्षणीय प्रभाव पडू शकतो. अशा प्रकारच्या व्यायामामुळे बसण्याच्या तुलनेत आपण अधिक कॅलरीज बर्न करतो. यामुळे वजन कमी होतं आणि ऊर्जा वाढते. याव्यतिरिक्त व्यायामामुळे स्नायू टोन्ड होतात. आपण गतिशील होतो आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो.” खालील प्रकारच्या बाबी करून आपण शरीराची हालचाल करू शकतो - 1) दर 30 मिनिटांनंतर जागेवरून उठून उभं राहण्याचा प्रयत्न करा. 2) फोनवर बोलताना किंवा टीव्ही पाहताना तुमचे पाय उंचावर ठेवा.