काकडी खाण्याचे दुष्परिणाम
मुंबई, 02 डिसेंबर : काकडीचा आहारातला समावेश किती उपयुक्त असतो, याची आपल्याला चांगली कल्पना आहे. काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असतं. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी खूप महत्त्वपूर्ण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर काकडी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. काकडी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे; पण काही तज्ज्ञांच्या मते काकडी खाल्ल्याने काही नुकसानदेखील होतं. काकडी खाण्याचे फायदे - काकडीचा कापलेला तुकडा डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी गुणकारी असतो. - वजन कमी करण्यासाठी काकडी अत्यंत उपयुक्त आहे. - काकडीत कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. तसंच व्हिटॅमिन के व ए भरपूर प्रमाणात असतं. काकडीत पाण्याचं प्रमाण जवळपास 95% असतं. - काकडी ही फायबर्सच्या बाबतीतही समृद्ध असते. फायबर्स बद्धकोष्ठता टाळण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. - काकडीमध्ये बीटा-कॅरोटीनसारखी अँटीऑक्सिडंट्सदेखील भरपूर असतात. ती शरीरातल्या फ्री-रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. - काकडीत असलेलं व्हिटॅमिन-के रक्त गोठण्यास मदत करतं आणि हाडं मजबूत आणि निरोगी ठेवतं. - व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी, तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लाभदायी असतं. - काकडीमध्ये लिग्नन्स म्हणून ओळखली जाणारी अनेक फायटोन्यूट्रिएंट्सदेखील असतात. - याशिवाय काकडी सनबर्न, जळजळ आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. हेही वाचा- रोज बटाटे खाऊनही वजन होऊ शकतं कमी; संशोधकांचा दावा काकडीमुळे होणारे त्रास काही संशोधनात असं आढळून आलं आहे, की काकडीमुळे काही त्रासही होऊ शकतात. शिजवलेल्या जेवणासोबत कच्ची काकडी खाणं योग्य नाही, असं अनेक आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. - तज्ज्ञांच्या मते, जेवणासोबत काकडी खाल्ली तर जेवण पचायला वेळ लागतो. कारण शिजवलेलं अन्न व कच्चं अन्न या दोन्हींचा पचन होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. - काकडीमध्ये कुकुर्बिटॅसिन आणि टेट्रासायक्लिक ट्रायटरपेनोइड्स हे विषारी पदार्थ असतात. त्यामुळे काकडीला कडवट चव येते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्यांचं अतिसेवन हानिकारक ठरू शकते. - काकडीमध्ये असलेल्या या विषारी द्रव्यांमुळे बद्धकोष्ठता, पोट फुगी व गॅस इत्यादी समस्या होतात. - काकडीमुळे पचनसंस्था मंद होते. - जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सीदेखील नुकसानकारक ठरतं. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक्षमता वाढविण्याचं काम करतं. काकडीमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात काकडीचं सेवन केलृं, तर ते नुकसानकारक ठरतं. काकडी जास्त प्रमाणात खाल्ली तर काकडीमधलं व्हिटॅमिन-सी प्रो-ऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. त्यामुळे फ्री-रॅडिकल्स तयार होतात व शरीरात सर्वत्र पसरतात. ही फ्री-रॅडिकल्स शरीरासाठी चांगली नसतात. त्यांच्यामुळे कर्करोग, अकाली वृद्धत्व व मुरुम इत्यादींचा धोका वाढतो.