नवी दिल्ली, 3 जानेवारी : अनेक लहान मुलांना अंथरूण ओलं करण्याची सवय असते; मात्र त्याबाबत फारसं बोललं जात नाही. अनेक पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काही मुलांना मोठेपणीही या आजाराला सामोरं जावं लागतं. या सवयीमुळे मुलांच्या विकासात अडथळे येतात. त्यांच्या मनावर परिणाम होऊन मुलं एकलकोंडी बनू शकतात. त्यामुळे बालवयातच त्यावर उपचार केले पाहिजेत. तसंच त्याबाबत जनजागृतीही केली पाहिजे. अंथरूण ओलं करण्याची सवय 6 ते 15 वर्षं वयाच्या मुलांमध्ये आजारात परिवर्तित होऊ शकते. या वयोगटातली मुलं रोज, आठवड्यातून एक-दोनदा किंवा अगदी महिन्यातून दोन-चार वेळा जरी अंथरूण ओलं करत असतील, तर त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. त्यासाठी अशा मुलांवर उपचार केले पाहिजेत. काही मुलांची ही सवय हळूहळू कमी होते; मात्र सगळ्यांच्याच बाबतीत तसं होत नाही, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे, अशी माहिती अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयाचे युरोलॉजिस्ट डॉ. संजय पांडे यांनी दिली. अंथरूण ओलं करण्याची सवय घालवण्यासाठी आधी ती सवय का लागते, हे जाणून घेतलं पाहिजे. आपला मेंदू आणि युरिनरी ब्लॅडर अर्थात मूत्राशय यांच्यातली ही प्रक्रिया असते. 3 ते 5 वर्षं वयोगटातल्या मुलांना जेव्हा आई किंवा इतर कोणी टॉयलेट ट्रेनिंग देतात, तेव्हा ती सवय दिवसा लावली जाते; मात्र रात्री गाढ झोपेमध्ये तसं होत नाही. मेंदू आणि ब्लॅडर यांची एकमेकांशी लय जुळलेली नसते. टॉयलेटमध्ये जाऊन ब्लॅडर मोकळं करण्याबाबत मेंदू आणि ब्लॅडर यांचा समन्वय साधला गेलेला नसतो, तेव्हाच अंथरूण ओलं केलं जातं. वैद्यकीय भाषेत याला enuresis असं म्हणतात. अनेक पालकांना व मुलांना त्याची लाज वाटते; मात्र हळूहळू ही सवय जाईल, असं पालकांना वाटतं. समाजात त्याबाबत जागरूकता कमी पडते आहे. अंथरूण ओलं करण्याच्या सवयीमुळे बाहेर जाणं, कोणाच्या घरी राहणं शक्य होत नाही. अशा प्रसंगी मुलांना ओरडा बसतो. इतकंच नाही, तर मुलांच्या प्रगतीवरही त्याचा परिणाम होतो, असंही डॉ. संजय पांडे यांनी सांगितलं. त्यामुळे मुलं लहान असतानाच त्यांची ही सवय घालवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मुलं जशी मोठी होतात, तसतसं त्यांना त्याची आणखीच लाज वाटू शकते. तो त्यांचा वयात येण्याचा काळ असतो. त्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक गरजा बदललेल्या असतात. त्या वेळी या गोष्टीचा त्यांना त्रास होऊ शकतो. Brain Exercise : परीक्षेच्या काळात हे व्यायाम ठरतील खूप फायदेशीर, मुलांचा मेंदू होतो सुपरफास्ट अशा मुलांना पालकांच्या मदतीशिवाय या आजारापासून सुटका हवी असते. त्यांनी बालरोगचिकित्सक, युरॉलॉजिस्ट यांची मदत घेतली पाहिजे. हा आजार लहान मुलांमध्येच सामान्यपणे आढळत असला, तरी काही प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमध्येही तो आढळतो. रात्री भरपूर पाणी पिण्याची सवय असलेल्या व गाढ झोपणाऱ्यांना हा त्रास होऊ शकतो. लहान मुलांसाठी मात्र 2 प्रकारच्या उपचारपद्धती आहेत. त्याकरिता मूल दिवसाही अंथरूण ओलं करतं का, हे जाणून घ्यावं लागतं. त्यानुसार कशी उपचारपद्धती द्यायची हे ठरवता येतं. मुलांना व पालकांना प्रशिक्षण देता येतं. वागणुकीबाबतच्या उपचारपद्धतीमध्ये रात्री पाणी कमी पिणं, दर दोन तासांनी गजर लावून उठणं अशा गोष्टी करता येतात. रात्रीचं जेवण आणि पाणी यात दोन तासांचं अंतर हवं, रात्री खूप द्रवपदार्थ न पिणं (उदा. कॉफी, चहा वगैरे) याही गोष्टी करता येतात. अशा सगळ्या गोष्टींबरोबरच औषधांचीही मदत घेता येते. त्यामुळे हा आजार समूळ जाऊही शकतो. बिहेविअरल थेरपी आणि फार्माकोथेरपी या दोन्हींच्या बळावर समाजातून या आजाराचं उच्चाटन केलं पाहिजे. अंथरूण ओलं करण्याच्या आजारामध्ये मुलाला बद्धकोष्ठता आहे का हेही जाणून घ्यावं लागतं. तसंच पालकांपैकी कोणाला तशी सवय असल्यास ते आनुवंशिकही असू शकतं. तसं असल्यास मुलांकडे ती सवय येण्याची शक्यता 14 ते 30 टक्के असते. दोन्ही पालकांना त्यांच्या लहानपणी तशी सवय असेल, तर ही शक्यता 45 ते 50 टक्के असते. लहानपणीच या आजारावर उपचार केले नाहीत, तर तरुणपणी हा आजार लज्जास्पद प्रसंग निर्माण करू शकतो. हा आजार असणारे काही रुग्ण 23 आणि 25 वर्षांचेही असतात. अंथरूण ओलं करण्याच्या सवयीमुळे लग्न न करण्याची भूमिकाही ते घेतात. त्यामुळे या आजाराबाबत पुरेशी जनजागृती होणं गरजेचं आहे. 6 ते 15 वयोगटातली मुलं अंथरूण ओलं करणार नाहीत, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. त्या वयात योग्य उपचार केले, तर हा आजार लवकर बरा होऊ शकतो. काहीच मुलांमध्ये ठरावीक वर्षांच्या अंतरानं पुन्हा ही सवय सुरू होऊ शकते. अशा मुलांना औषधोपचारांची खरी गरज असते. काही वेळा हा आजार मुलांच्या मानसिक स्थितीमुळे निर्माण होतो. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाणं, एका शहरातून दुसऱ्या शहरात राहायला जाणं, शिक्षकांचं ओरडणं, इतर मुलांचं चिडवणं अशा काही गोष्टी मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. अशा गोष्टी मुलांची अंथरूण ओलं करण्याची सवय पुन्हा सुरू होण्यास कारणीभूत ठरू शकतात. हा आजार बरा होण्यासारखा आहे, याची जाणीव समाजाला करून देण्याची गरज आहे. त्यासाठी युरॉलॉजिस्ट किंवा बालरोगतज्ज्ञ नक्कीच मदत करू शकतात. पालकांनी याकडे डोळसपणे पाहायला हवं. त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे धोके वाढू शकतात. म्हणून समाज म्हणून प्रत्येक पालकानं मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी ही सवय मोडायला त्यांना मदत केली पाहिजे.