विश्वासघातकी व्यक्तींमध्ये असतात 'या' सवयी, वेळीच व्हा सावध, नाहीतर...
मुंबई, 16 डिसेंबर: रोजच्या जगण्यात आपण अनेकांना भेटत असतो. आपले अनेकांशी नातेसंबंध असतात. काही जण आपल्यावर मनापासून व निःस्वार्थी प्रेम करत असतात, तर काही प्रेम असल्याचं दाखवत असतात. आपल्यासाठी कोण चांगलं, कोण वाईट याची योग्य पारख आपण केली नाही, तर विश्वासघातकी वा खोटारड्या व्यक्तींपासून आपल्याला त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते, धोका देणाऱ्या व्यक्तींच्या 10 सवयी ओळखण्यासारख्या असतात. या सवयी जाणून घेतल्या, तर विश्वासघातकी व्यक्ती आपण सहज ओळखू शकतो. या सवयींविषयी जाणून घेऊया! समोरच्याला गोंधळात टाकणं- अशा व्यक्तींशी बोलत असताना वेळोवेळी ते तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असतात. स्पष्ट बोलण्याऐवजी ते तुम्हाला जास्त रंगवून गोष्टी सांगत असतात. दुसऱ्यांवर आरोप करणं- आपल्या अडचणींसाठी दुसऱ्यांना दोष देणाऱ्या व्यक्ती विश्वासघातकी असतात. अशा व्यक्ती स्वतः शोषित असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. इतरांवर विश्वास न ठेवणं- अशा व्यक्ती दिलेला शब्द वा वचन पाळत नाहीत. त्यांना इतर माणसंही आपल्यासारखीच वाटतात. त्यामुळे ते कोणावर विश्वास ठेवत नाहीत. भावनांची कदर न करणं- अशी व्यक्ती एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ती गोष्ट तुमच्या भावनांचा विचार न करता वारंवार करत असतात. अशा व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात. अशांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. **हेही वाचा:** चाणाक्ष बुद्धीसाठी नको आणखी काही! हे 5 पदार्थ मेंदूच्या आरोग्यासाठी आहेत उपयुक्त वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणं- आपण सहसा आपल्या वैयक्तिक गोष्टी कधी कोणाला सांगत नाही; पण विश्वासघातकी व्यक्तींना वैयक्तिक बाबींमध्ये फार रस असतो. ते वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यासंबंधीचे प्रश्न वारंवार विचारतात. पहिल्याच भेटीत आपल्या जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करतात. गॅसलायटिंग करणं- अशा व्यक्ती तुमचं काही तरी वाईट करतात आणि तरीही तुम्हाला बोलतात. ते स्वतःला तुमच्यासमोर अशा प्रकारे सादर करतात की, तुम्हाला तुम्ही स्वतःच चुकीचं असल्याचं वाटतं. अशा व्यक्ती गॅसलायटिंग करण्यात पारंगत असतात. सहानुभूती नसणं- अशा व्यक्तींमध्ये सहानुभूतीची कमतरता असते. अशा व्यक्तींना जेव्हा तुम्ही आपली सुख-दु:खं सांगता तेव्हा ते ती लक्ष देऊन ऐकत नाहीत. उलट तुमचं दु:ख वा अडचण समजून न घेताच तुम्हाला सल्ले द्यायला लागतात. संवाद साधताना वरचढ होण्याचा प्रयत्न करणं- अशा व्यक्ती चर्चा करताना आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. इतरांचं ऐकून घेण्याऐवजी आपल्याच बढाया मारण्याचा प्रयत्न करत असतात. अति चांगुलपणा दाखवणं- समोर असताना आपली स्तुती करणं व पाठीमागे आपल्याला नावं ठेवणं ही विश्वासघातकी व्यक्तींची सवय असते. अशा व्यक्ती तुमची एवढी स्तुती करतात, की तुम्हाला ती सहन होत नाही. दिलेला शब्द न पाळणं- अशा व्यक्ती दिलेला शब्द वा वचन कधी पाळत नाहीत. तज्ज्ञांच्या मते दिलेला शब्द वा वचन न पाळणं ही विश्वासघातकी व्यक्तींची एक महत्त्वाची सवय असते.