माणसाला होऊ शकतो का बर्ड फ्लूचा संसर्ग?
गेल्या काही वर्षांत बर्ड फ्लूचा धोका सातत्यानं वाढत आहे. जगभरात बर्ड फ्लू रोखण्यासाठी लाखो पक्षी मारण्यात आले आहेत. भारताचा विचार करता केरळमध्ये बर्ड फ्लूचा धोका सर्वाधिक आहे. कोरोनानंतर बर्ड फ्लूची साथ येऊ नये यासाठी इंग्लंड सरकारने पोल्ट्री फार्मधारकांना विशेष सूचना केल्या आहेत. बर्ड फ्लूची आतापर्यंतची स्थिती पाहता या विषाणूचा संसर्ग माणसाला होऊ शकतो का, तसंच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा संसर्ग पोहोचतो का, असे नानविध प्रश्न सातत्याने विचारले जातात. अर्थात काही ठिकाणी या विषाणूचा धोका पाहता, नागरिकांना या विषाणूच्या संसर्गाबाबत माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे बर्ड फ्लूच्या संसर्गाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊ या. बर्ड फ्लूचा धोका बर्ड फ्लूचा धोका पाहता सध्या केरळमध्ये 20 हजारांहून अधिक पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंग्लंडमधले पोल्ट्री फार्मचालक आणि पक्षिपालकांना 7 नोव्हेंबरपासून आपल्याकडचे पक्षी पिंजऱ्यात ठेवण्याचे आदेश तिथल्या सरकारने दिले आहेत. कोरोनानंतर बर्ड फ्लूचा धोका वाढत असल्याने या गोष्टी केल्या जात आहेत. भारताचा विचार करता केरळमध्ये बर्ड फ्लूचा धोका सर्वाधिक आहे. केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यातल्या हरिपद नगरपालिका क्षेत्रात अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिथल्या स्थानिक प्रशासनाने 20,471 बदकांना मारण्याचे आदेश दिले आहेत. तसंच तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बदक, कोंबड्या, बटेरसह अन्य लहान पाळीव पक्ष्यांची अंडी आणि मांस खाण्यास, तसंच त्याची विक्री करण्यास बंदी घातली आहे. केरळमधला बर्ड फ्लूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारदेखील अलर्ट मोडवर आलं आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय पथक अलप्पुझा येथे पाठवलं आहे. आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त बदकांना मारण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व्ही. आर. कृष्णा यांनी केंद्रीय पथकाला दिली आहे. हेही वाचा - डायबेटिसच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा की नाही? वाचा फायदे अन् तोटे इंग्लंडमध्येही सतर्कता इंग्लंड सरकारनेदेखील सर्व पोल्ट्री फार्म चालकांना आणि पक्षिपालकांना 7 नोव्हेंबरपासून आपल्याकडचे सर्व पक्षी पिंजऱ्यात ठेवण्यास सांगितलं आहे. पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्ष्यांना बर्ड फ्लूचा धोका कमी असतो. त्यामुळे या पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी हा आदेश देण्यात आला आहे, असं सरकारनं स्पष्ट केलं. बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लुएंझा असंही म्हटलं जातं. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. हा विषाणू पक्ष्यांपासून पक्ष्यांमध्ये पसरतो आणि बहुतांश पक्ष्यांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. हा विषाणू सामान्य विषाणूप्रमाणे पसरतो. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अर्थात सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग झालेल्या पक्ष्याची लाळ, नाकातून वाहणारा द्रव किंवा मलाच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. संसर्ग झालेल्या पक्ष्याच्या संपर्कात अन्य पक्षी आल्यास त्यांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हेही वाचा - विराट कोहलीसारखं डाएट फॉलो करायचंय? ‘या’ पदार्थांचा करा आहारामध्ये समावेश कसा होतो बर्ड फ्लूचा प्रसार? `सीडीसी`च्या मते, बर्ड फ्लू हा जंगली पक्ष्यांमधून पाळीव पक्ष्यांमध्ये फैलावतो. हा विषाणू पक्ष्यांची आतडी आणि श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. बऱ्याचदा या संसर्गामुळे पक्ष्यांचा मृत्यूदेखील होतो. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 1997मध्ये पहिल्यांदा माणसाला बर्ड फ्लू अर्थात H5N1चा संसर्ग झाला होता. ही व्यक्ती हॉंगकॉंगमधली होती. 2003 नंतर आतापर्यंत आशिया, युरोप आणि आफ्रिकेतल्या नागरिकांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झाला तर त्याच्या शरीरात सामान्य किंवा गंभीर लक्षणं दिसतात. सामान्य लक्षणांमध्ये जुलाब, नाकात जळजळ आणि उलट्या यांचा समावेश असतो.याशिवाय संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये ताप, खोकला, घशात खवखव, नाक वाहणं, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं दिसतात. गंभीर लक्षणांमध्ये तीव्र ताप किंवा न्यूमोनिया होऊ शकतो. यामुळे रुग्णालयात दाखलही व्हावं लागतं. काही केसेसमध्ये रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. माणसांनाही होतो बर्ड फ्लू? जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू हा A टाइप इन्फ्लुएंझा विषाणू आहे. या विषाणूचा जनावरांसह माणसांनादेखील संसर्ग होऊ शकतो. एखादी व्यक्ती संसर्ग झालेल्या पक्ष्याच्या थेट संपर्कात आली तर त्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू हवेत अस्तित्वात असतो. त्यामुळे श्वसनाद्वारेदेखील एखादी व्यक्ती बर्ड फ्लूने संक्रमित होऊ शकते. डोळे, नाक किंवा तोंडातून हा विषाणू शरीरात जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने संसर्ग असलेल्या जागी स्पर्श केला तर त्या माध्यमातून हा विषाणू फैलावू शकतो. `सीडीसी`ने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग होतो, तेव्हा तो सामान्य किंवा गंभीर आजारी पडू शकतो. बर्ड फ्लूचा विषाणू हा सर्वांत धोकादायक H5N1 प्रकारातला असतो. H5N1चा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांचा मृत्यू होतो. `सीडीसी`च्या मते, आतापर्यंत माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याच्या केसेस कमी प्रमाणात समोर आल्या आहेत; पण माणसालादेखील बर्ड फ्लू होऊ शकतो. संसर्गाची शक्यता किती जास्त? `सीडीसी`ने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झाला तर त्याच्यामुळे दुसरी व्यक्ती संसर्गग्रस्त होण्याची शक्यता जवळपास कमीच असते. एखाद्या संसर्गग्रस्त व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लू होणं असं फार कमी वेळा घडतं. एखादी व्यक्ती बर्ड फ्लूने संसर्गग्रस्त असेल, तर त्याच्यामुळे जास्त प्रमाणात संसर्ग पसरत नाही. बर्ड फ्लूचा विषाणू फार वेगानं म्युटेट होतो. त्यामुळे पसरण्याची जास्त क्षमता या विषाणूत असते. पोल्ट्री फार्म किंवा कत्तलखान्याच्या आसपास राहणाऱ्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. हेही वाचा - Heart Attack : शरीराच्या ‘या’ भागातून घाम येणं धोक्याची घंटा, येऊ शकतो हार्ट अटॅक अगदी छोट्या गोष्टींच्या माध्यमातून बर्ड फ्लूचा संसर्ग टाळता येऊ शकतो. केरळमधल्या अलप्पुझा येथे प्रशासनाने पक्ष्यांची अंडी आणि मांस खाण्यावर, तसंच त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. हा विषाणू पसरण्याची शक्यता असल्याने सतर्क राहावं, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. संसर्ग टाळण्यासाठी उपाय जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुतले पाहिजेत. खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड झाकून घेतलं पाहिजे. आजारपणाची लक्षणं दिसताच तातडीनं आयसोलेट झालं पाहिजे. आजारी व्यक्तींशी संपर्क टाळला पाहिजे आणि डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळलं पाहिजे. पक्ष्यांची कत्तल केली जाते असे पोल्ट्री फार्म, पोल्ट्री मार्केट यांसारख्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे.