पणजी, 4 डिसेंबर : थर्टीफर्स्ट पार्टी (thirty first party) आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषासाठी (New Year Celebration) मुंबई होऊन गोव्याला गेलेले 2 हजार प्रवासी भर समुद्रातच अडकून पडले होते. त्या प्रवाशांची कोरोना चाचणी झाल्यानंतर त्यांना आता सोडण्यात आले आहे. कॉर्डेलिया क्रूज हे भलं मोठं जहाज दोन हजार प्रवासी आणि शेकडो कर्मचाऱ्यांसह थर्टीफर्स्ट पार्टी तथा नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने गोव्यात (Goa) गेले होते. मात्र क्रूजवरील एक कर्मचारी आणि 66 प्रवासी कारोनाबाधित आढळल्याने सर्व दोन हजार प्रवाशांसह शेकडो कर्मचाऱ्यांना क्रूजवरच थांबवण्यात आलं होतं. क्रूजवरील प्रवासी आणि पोलिसंमध्ये बाचाबाची क्रूजमधील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कोणालाही क्रूझच्या बाहेर जाऊ दिलं जाणार नाही, असा निर्णय मुर्मोगाव पोर्ट ट्रस्टने घेतला होता. त्यामुळे क्रूजमधील सर्व प्रवासी शीपवरच अडकून पडले होते. या दरम्यान प्रवाशांनी क्रूजवरील अधिकारी आणि गोवा पोलिसांशी वाद घातल. त्यांच्यातील वादाचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. 66 प्रवाशी पॉझिटिव्ह क्रूझवर नेमकं काय होत होतं हे या व्हिडिओमधून समोर आलंय. हजारो प्रवाशी आपल्या परीवारासह अडकून पडले होते. त्यातच त्यांना कधी सोडले जाणार? त्यांची जायची सोय कशी केली जाणार? असे अनेक प्रश्न प्रवासी पोलिसांना आणि क्रूज प्रशासनाला विचारत होते. 3 दिवसात 2 हजार पेक्षा जास्त प्रवाशांच्या टेस्ट झाल्या. त्यात जवळपास 66 प्रवाशी पॉझिटिव्ह आले. त्यांना सध्या गोव्यातच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर जहाज आता मुंबईच्या दिशेला रवाना झालं आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा : आर्यन खानला अटक झालेल्या क्रूजमध्ये कोरोनाचा स्फोट, गोव्यात पोहोचताच अनेकांना बाधा सर्वात आधी कर्मचारी पॉझिटिव्ह गोव्यातील विक्टर हॉस्पिटलच्या मेडिकल टीमने प्रवाशांच्या चाचण्या केल्या आहेत. कॉर्डेलिया क्रूजवरील एका कर्मचाऱ्याला सर्दी, खोकला आणि ताप आला होता. यानतंर त्याची क्रूझवरच करोना चाचणी केली गेली. त्यात तो कर्मचारी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्या कर्मचाऱ्याला शीपवर क्वारंटाईन करण्यात आले. यानंतर क्रूझवरील सर्व कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची देखील आरटीपीसीआर टेस्ट केली गेली. ज्यावेळेस क्रूजवरील कर्मचारी करोनाबाधित आढळला त्यावेळेस क्रूजवरील डॉक्टरांनी याबाबतची माहिती गोवा आरोग्य विभागाला दिली. यानंतर जलद गतीने सूत्रे हलवत मुर्मोगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कॉर्डेलिया क्रूज मुर्मोगाव येथील किनाऱ्यापासून काही अंतर समुद्रात एंकर करण्यात आले होते. कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राचं मोठं नुकसान थर्टी फर्स्ट पार्टी आणि नवीन वर्षाकरता गोव्यात पर्यटनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र करोनाची वाढती आकडेवारी आणि ओमायक्रोनचा वाढता धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद करण्यात आली. गोव्याला पर्यटन क्षेत्रात मोठं नुकसान सोसावे लागले. त्यात कॉर्डेलिया क्रूजवर जो प्रकार घडला त्याने सध्याच्या काळात गोव्यात पर्यटन करणे किती सुरक्षित आहे? असा प्रश्न देखील आता निर्माण होतोय. गोव्यात कडक निर्बंधांची शक्यता विशेष म्हणजे ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे त्यांनादेखील कोरोनाची लागण होणे हे धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यात ओमायक्रोनचा वाढता धोका, यामुळे गोवा सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आगामी काळात गोव्यात कडक निर्बंध लावले जातील, हे स्पष्ट आहे.