नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : माजी विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर एक लेन वाढवून सध्याच्या सहा लेनऐवजी हा मार्ग आठ लेनचा करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अशा स्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते दिल्ली हा सर्वात अद्ययावत महामार्ग होणार असल्याचं सांगितलं. या महामार्गाचं 70 टक्के काम पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कसा असेल हा महामार्ग? काय आहेत सुविधा? चला सविस्तर जाणून घेऊ. अब दिल्ली दूर नही… मुंबईदरम्यान नवीन द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून, हा महामार्ग मुंबईतील नरिमन पॉईंटशीही जोडण्यात येणार आहे. महामार्ग झाल्यास हा प्रवास बारा तासांत होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या महामार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून या महामार्गावरून वीजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बस चालवण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. महामार्गाच्या कामाला गती देण्यात येत आहे. सध्या मुंबई-दिल्ली रस्ते मार्गे वाहनांना 1 हजार 450 किलोमीटर अंतर पार करावे लागते. यासाठी 24 तास लागतात. हा महामार्ग नरिमन पॉईंटशी जोडण्याचे नियोजन असून त्यामुळे येथूनही रस्तेमार्गे दिल्लीला बारा तासांत जाता येणे शक्य होईल. मोठ्या शहरातील प्रवास वेळ घटणार गेल्या काही वर्षांत वांद्रे-वरळी सागरी सेतू, 55 उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे महामार्ग अशी अनेक कामे केली. मुंबई-दिल्ली महामार्ग नरिमन पॉईंट तसेच वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. दिल्ली-चंढीगड, दिल्ली-डेहराडून, दिल्ली-हरिद्वार आदी मार्गाचे काम सुरू असून त्यामुळे या शहरांतील प्रवास दोन तासांत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विनायक मेटेंच्या गाडीला अपघात नेमका कसा झाला? चालकाचं काय चुकलं? फडणवीसांनी अधिवेशनात सगळं सांगितलं 1 लाख कोटींचा प्रकल्प दिल्ली-मुंबई महामार्ग सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. हा महामार्ग भिवंडीतून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट-मुंबईपर्यंत जाणार आहे. मुंबईतील नरिमन पॉइंटला जोडण्याची योजना आहे. त्यासाठी समुद्रावर पूल बनवून वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याची योजना आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. दिल्ली-मुंबईला बेंगळुरू आणि पुणे ते औरंगाबादला जोडणारा महामार्ग बांधण्याचीही योजना सुरू आहे. राज्य सरकारने या महामार्गाचे भूसंपादन तातडीने सुरू करावे, असे गडकरींनी म्हटले आहे. मुंबई-नाशिक महामार्ग 6 लेन सध्याचा नाशिक-मुंबई महामार्गाचा चौपदरीकरण सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्चून लवकरच सहा पदरी होणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर मुंबई, पुणे व्यतिरिक्त 5 नवीन शहरे विकसित करता येतील, असा विश्वास गडकरींना वाटतो. सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर या रस्त्यालाही मंजुरी मिळाली आहे. गोल्डन चतुर्भुज महामार्ग: भारताचा हा सुवर्ण चतुर्भुज महामार्ग जगातील सर्वात लांब महामार्गांपैकी एक आहे. यासह देशातील अनेक मोठी शहरे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई याशिवाय पुणे, अहमदाबाद, जयपूर, कानपूर, सुरत, बेंगळुरू, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरशी जोडली गेली आहेत.