खरगेंचा राजकीय प्रवास
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस पक्षाला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खरगे आता काँग्रेसचे नवे कॅप्टन झालेत. मल्लिकार्जुन खरगे 7897 मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना सुमारे 1000 मते मिळाली. मल्लिकार्जुन खरगे 8 पट अधिक मतांनी विजयी झाले आहेत. हा त्यांचा मोठा विजय मानला जात आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची एंट्री शेवटच्या क्षणी झाली आणि त्यांनी निवडणूकही जिंकली. त्यांच्या एंट्रीनंतर काँग्रेसचे 75 वर्षीय दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना आपलं नाव मागे घ्यावे लागले. आपला फॉर्म परत घेत त्यांनी खरगे यांना पाठींबा दिला. मल्लिकार्जुन खरगे यांचा काँग्रेस प्रवेश 70 च्या दशकात झाला. एक काळ असा होता की काँग्रेस वाईट काळातून जात होती, त्यावेळी काँग्रेसचे दोन भाग झाले होते, एक गट जुन्या नेत्यांचा आणि दुसरा तरुणांचा गट होता. इंदिरा गांधी तरुणांचे नेतृत्व करत होत्या. कर्नाटकातील मल्लिकार्जुन हा 27 वर्षीय तरुण इंदिरा गांधींच्या गटात सामील झाला. खरगे राजकारणात कसे आले? मल्लिकार्जुन खरगे हे तरुण होते, मात्र त्यांची महत्वकांक्षा मोठी होती. खरगे यांची हिच प्रतिभा ओळखून, कर्नाटकातील सर्वात मोठे स्थानिक नेते देवराज उर्स यांनी त्यांना विधानसभेचे तिकीट मिळवून दिले. तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी घरोघरी पत्रके वाटली, भिंतींवर स्वतः घोषणा लिहिल्या, निवडणुकीचा निकाल आला तेव्हा खरगे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. हा विजय म्हणजे आगामी काळात एका खंबीर नेत्याच्या उदयाची नांदी होती, त्यावेळी देशातील सर्वात जुन्या पक्षाची कमान आपल्या हाती येईल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. वाचा - शिवसेनेवरच संकट टळलं, दिल्ली कोर्टाचा मोठा दिलासा, मशाल धगधगतीच राहणार! 1972 मध्ये, खरगे पहिल्यांदा राज्यातील गुरुमितकल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. खरगे यांच्यासाठी ही केवळ सुरुवात होती. 1972 नंतर खरगे या जागेवरून सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आले, पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवराज उर्स यांनी खरगे यांना मंत्री केले. 1976 मध्ये खरगे यांना प्रथम प्राथमिक शिक्षण खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले. यानंतर खरगे कर्नाटक सरकारची वेगवेगळी खाती सांभाळत राहिले. खरगे तीनदा कर्नाटकचे मुख्यमंत्री 2004 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा पुनरागमन केले. काँग्रेस आणि जेडीएसने मिळून सरकार स्थापन केले. यावेळी मल्लिकार्जुन खरगे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, अखेरच्या क्षणी बाजी उलटली. व्यक्तिशः खरगे यांचे मित्र आणि राजकीय प्रतिस्पर्धी धरमसिंग यांना हायकमांडने मुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले होते. 2009 मध्ये काँग्रेसने गुलबर्गमधून खरगे यांना तिकीट दिले होते. खरगे लोकसभेत पोहोचले आणि मनमोहन सिंग यांच्या यूपी-2 मध्ये मंत्री झाले. 2013 मध्ये कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यावर यावेळी पुन्हा खरगे यांच्याकडे राज्याची कमान सोपवली जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, खरगे यांचे हात पुन्हा रिकामे राहिले. 2013 पासून काँग्रेसची कामगिरी सतत खालावत गेली. पण, खरगे यांचे राजकारण चमकले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 44 जागांवर घसरण झाली, तेव्हा बहुतांश कॅबिनेट मंत्र्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. या मोदी लाटेतही खरगे विजयी होऊन लोकसभेत पोहोचले होते. काँग्रेसने त्यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पक्षाचे नेते म्हणून निवडले. वाचा - भाजपला धक्का, शाहू घराण्यातील युवराज शिवबंधनात अडकणार! 2019 मध्ये मल्लिकार्जुन खरगे पहिल्यांदाच निवडणूक हरले 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खरगे यांचा पराभव झाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच पराभव होता. पराभव होऊनही काँग्रेस हायकमांडची कृपा खरगे यांच्यावर राहिली. त्यांना 2020 मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आले. खरगे यांना केवळ राज्यसभेवर पाठवले नाही, तर 2021 मध्ये त्यांना सभागृहात विरोधी पक्षनेतेपदही देण्यात आले. जेव्हा खरगेंच्या आई आणि बहिणीची त्यांच्यासमोर हत्या झाली मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म 1942 मध्ये झाला. खरगे यांनी आपल्या आई आणि बहिणीचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहिल्याचे सांगितले जाते. कर्नाटकातील वरवट्टी गाव जेथे खरगे यांचा जन्म झाला ते हैदराबादच्या निजामाच्या अंतर्गत होते.
1945 ची सालची गोष्ट आहे, जेव्हा हैदराबाद निजामाचे काही सैनिक खरगेंच्या वरवट्टी गावात पोहोचले. त्यावेळी ते घराबाहेर खेळत होते. आई व बहीण घरी तर वडील कामावर गेले होते. आई आणि बहीण दोघींनाही निजामाच्या सैनिकांनी जिवंत जाळले होते. त्यावेळी खरगे यांचे वय सुमारे 3 वर्षे होते, ते फक्त बघतच राहिले. आईच्या निधनानंतर खरगे वडिलांसोबत गुलबर्गा शहरात गेले. वडील गिरणीत काम करायचे. खरगे यांनी सुरुवातीचे शिक्षण गुलबर्गा येथे केले आणि त्यानंतर तेथील शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच राजकारणाचेही सुरुवातीचे शिक्षण त्यांनी येथूनच घेतले. खरगे यांनी महाविद्यालयातच पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांची विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाली. महाविद्यालयीन राजकारणाच्या काळात खरगे कामगारांच्या हक्काच्या लढ्यात सहभागी होऊ लागले.