नवी दिल्ली 21 एप्रिल : कॅरेबियन समुद्रात क्यूबा (Cuba) नावाचा देश आहे. हा देश म्हणजे एक छोटंसं बेट आहे; पण तिथे कोरोनाप्रतिबंधक एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच लशी (Anticovid Vaccine) विकसित करण्याचं काम सुरू आहे. त्यापैकी दोन लशी अंतिम टप्प्यात आहेत. त्या लशींच्या तिसऱ्या ट्रायल्स (Trials) यशस्वी झाल्या, तर क्यूबा हा स्वदेशी लस असलेला लॅटिन अमेरिकेतला पहिला देश असेल. अर्थात, क्यूबाच्या वैद्यकीय इतिहासाकडे पाहिलं, तर यात काही आश्चर्यकारक नाही. मदत करण्याचा इतिहास मार्च 2020 मध्ये युरोपीय देश कोरोनाशी लढत होते, जगभरातले आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ तिथे जायला कचरत होते, तेव्हा क्यूबासारख्या छोट्या देशाने आपल्याकडच्या डॉक्टर्सची टीम युरोपात, तसंच व्हेनेझुएला (Venezuela), निकाराग्वा (Nicaragua), जमैका (Jamaica), सुरिनाम (Surinam) यांसारख्या देशांत पाठवली. कारण त्या देशांत कोरोनाचं अक्षरशः तांडव सुरू होतं. क्यूबाच्या डॉक्टर्सचं वैशिष्ट्य काय? क्यूबातले डॉक्टर्स (Cuban Doctors) जेव्हा ग्रॅज्युएशन करत असतात, तेव्हा त्यांना अशा कोणत्या तरी देशात पाठवलं जातं, की जिथे एखादा संसर्गजन्य रोग (Tranmissible Disease) पसरलेला असेल किंवा त्या देशाला दुसरी काही गरज असेल. ते साधारणतः एक-दोन वर्षं तिथे काम करतात. संसर्ग पसरलेल्या स्थळांवर जाण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये त्यांना कसून प्रशिक्षण दिलं जातं. त्यात वैयक्तिक सुरक्षितता, स्वच्छता यांच्याकडे लक्ष देणं सर्वांत महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्यांना त्या देशाची भाषा, आहारविहार, संस्कृती यांचं मूलभूत ज्ञानही दिलं जातं. क्यूबातल्या वैद्यकीय सुविधा कशा आहेत? क्यूबाची लोकसंख्या आहे 1.15 कोटी. या देशाची अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी इथल्या आरोग्य यंत्रणेची (Healthcare System) जगभर दखल घेतली जाते. जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) म्हणते, की क्यूबातल्या आरोग्यविषयक सेवा-सुविधांकडून सगळे देश धडे घेऊ शकतात. सरकारी आकडेवारीनुसार, क्यूबातले सुमारे 30 हजार डॉक्टर्स जवळपास 60 देशांमध्ये सेवा देत आहेत. क्यूबात दर 155 लोकांमागे एक डॉक्टर उपलब्ध आहे. हे प्रमाण अमेरिका आणि इटलीपेक्षा चांगलं आहे. क्यूबात अनेक चांगले वैद्यकीय विशेषज्ञ आहेत. त्यामुळे जगभरातल्या डॉक्टर्सना क्यूबात प्रशिक्षणही दिलं जातं. 123 देशांतल्या डॉक्टर्सनी घेतलं प्रशिक्षण क्यूबामधल्या ‘लॅटिन अमेरिकन स्कूल ऑफ मेडिसिन’मध्ये (ELAM) फिजिशियन्सना प्रशिक्षण मिळतं. 1998पासून आतापर्यंत 123 देशांतल्या डॉक्टर्सनी क्यूबात प्रशिक्षण घेतलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासंचालक बान की मून (Ban Ki Moon) यांनीही ELAM हे जगातलं सर्वांत आधुनिक वैद्यकीय महाविद्यालय असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच क्यूबाच्या वैद्यकीय सुविधांना जगभरात क्यूबन मॉडेल अशी ओळख आहे. क्यूबामध्ये जाणकार डॉक्टर्सची कमतरता नाही; पण आर्थिक कमजोरी मात्र आहे. त्यामुळे तिथल्या डॉक्टर्सना बाहेरच्या देशांत पाठवणं हे क्यूबाच्या अर्थव्यवस्थेला अनेक अंगांनी मदत करतं. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटचे विशेषज्ञ मार्क केलर या संदर्भात सांगतात, की 1998मध्ये व्हेनेझुएलात अंतर्गत क्रांती झाली, त्यानंतर व्हेनेझुएला आणि क्यूबा हे देश एकमेकांना मदत करू लागले. खनिज तेलाच्या दृष्टीने समृद्ध असलेला व्हेनेझुएला क्यूबाला आर्थिक आणि खनिज तेलाच्या रूपाने मदत करत होता. त्या बदल्यात क्यूबा व्हेनेजुएलामध्ये डॉक्टर्स आणि खेळांचे प्रशिक्षक पाठवत होता. लशींची नावं निश्चित सध्या क्यूबामध्ये दररोज नवे 1000 कोरोनाबाधित आढळत आहेत. याचाच अर्थ असा, की कोरोनाची साथ नियंत्रणात नाही. ती नियंत्रणात आणण्यासाठी क्यूबातले शास्त्रज्ञ एकाच वेळी पाच लशींवर काम करत आहेत. त्यापैकी दोन लशी अंतिम टप्प्यात आहेत. दोन लशींना Soberana हे स्पॅनिश नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ आहे सार्वभौमत्व. एका लशीला क्यूबाचा क्रांतिकारक जोस मत्रि याचं नाव देण्यात आलं आहे. त्याव्यतिरिक्त दोन लशी क्यूबाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांना समर्पित करण्यात आल्या आहेत. चाचण्यांमध्ये हजारो लोक सोबेराना टू या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीमध्ये 44 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. चाचण्यांचे निष्कर्ष चांगले निघाले, तर त्या लशी सेंटर फॉर स्टेट कंट्रोल ऑफ मेडिसिन्स, इक्विपमेंट अँड मेडिकल डिव्हायसेस (CECMED) या संस्थेकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातील. तिथून मंजुरी मिळाल्यानंतर या लशी हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाऊ जातील. इराण आणि व्हेनेझुएला या देशांमध्येही या लशीच्या चाचण्या सुरू आहेत. यातली महत्त्वाची गोष्ट अशी, की कोरोनाने थैमान घातलेलं असूनही क्यूबा हा जगातल्या अशा काही मोजक्या देशांपैकी आहे, जिथे परदेशी लशी घेऊन लसीकरण सुरू झालेलं नाही. संशोधन कोरोनाप्रतिबंधक लशीचा तिसरा डोस आवश्यक आहे का, की केवळ दोन डोस दोन आठवड्यांच्या अंतराने देणं पुरेसं आहे, या मुद्द्यावर क्यूबातले शास्त्रज्ञ सध्या संशोधन करत आहेत. लस सर्वसाधारण फ्रीजच्या तापमानात साठवता येऊ शकेल, असाही प्रयत्न आहे. सध्या सुरू असलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष मे महिन्याच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अब्डाला या नावाच्या क्यूबातच तयार केलेल्या लशीचे डोस क्यूबातल्या एक लाख 24 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत देण्यात आले आहेत. क्यूबा सरकारने असा दावा केला आहे, की अनेक देशांनी त्यांच्याकडून लस विकत घेण्याची तयारी दर्शवली असून, सुमारे 10 कोटी डोसची ऑर्डर मिळू शकते. अनेक गरीब देश पाश्चिमात्य देशांकडून महागडी लस विकत घेऊ शकत नाहीत, असे देश क्यूबाकडे आशेने पाहत आहेत. व्हेनेझुएला या कम्युनिस्ट देशानेही क्यूबात विकसित झालेल्या अब्डाला या लशीचं उत्पादन सुरू केलं आहे. लस दुसऱ्या देशातून न घेण्याचं कारण क्यूबाने अमेरिका (USA) किंवा अमेरिकेच्या मित्रदेशांकडून लस विकत न घेता स्वतःच विकसित करण्यामागे काही कारणं आहेत. क्यूबा आणि अमेरिका या देशांचे संबंध तणावपूर्ण आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जग दोन शक्तिशाली भागांमध्ये विभागलं गेलं, तेव्हा क्यूबाने अमेरिकेऐवजी रशियाची (Russia) बाजू घेतली होती. हीच गोष्ट अमेरिकेला खटकत राहिली. त्यामुळे अमेरिकेने क्यूबावर अनेक निर्बंध लादले. त्यामुळेच आजही या दोन्ही देशांतले संबंध तणावपूर्णच आहेत.