मुंबई 30 एप्रिल**:** ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke) हा भारतीय सिनेक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कांपैकी एक मानला जातो. ज्या प्रमाणे विदेशात ऑस्कर जिंकणाऱ्याला काळातील सर्वोच्च कलाकारांच्या पक्तीत स्थान मिळतं, अगदी त्याच प्रमाणे भारतात ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ पटकावणाऱ्याला सर्वोत्कृष्ठ कलाकार मानलं जातं. परंतु हा पुरस्कार ज्या व्यक्तीच्या नावानं दिला जातो ते दादासाहेब होते तरी कोण? आज त्यांची 151वी जयंती आहे. (Dadasaheb Phalke success story) या निमित्तानं पाहूया संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या दादासाहेब नामक एका अवलियाची यशोगाथा… दादासाहेब फाळके यांना भारतीय सिनेसृष्टीचं जनक असं म्हटलं जातं. त्यांचं पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके असं होतं. पण लोक त्यांना दादासाहेब याच नावानं ओळखतात. त्यांच्या अथक प्रयत्नामुळंच भारतात चित्रपटांची संस्कृती रुजली. ते एक उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते. 1990 साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी वास्तुकला व साचेकाम यांचाही अभ्यास केला. याच सुमारास प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफ्टोन ब्लॉक करणं याचा त्यांना छंद जडला. हे काम करत असतानाच हौशी कलावंतांना अभिनय शिकविणं, त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणं हे काम देखील ते करत होते. 1901 साली त्यांनी एका जर्मन जादूगाराचं शिष्यत्व पतकरलं. अन् त्यांच्याच मदतीनं सर्वप्रथम जादुचे प्रयोग दाखवण्यास त्यांनी सुरुवात केली. पुढे या जादुचं तंत्र अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी 1909 साली ते जर्मनीला गेले. अन् तिथंच त्यांना चित्रपट तयार करण्याचं तंत्र कळलं. पुढे साहित्य मिळवण्यासाठी ते इंग्लंडला देखील गेले होते. लक्षवेधी बाब म्हणजे आपल्या बायकोचे दागिने, आपली सर्व मालमत्ता, विम्याची रक्कम हे सर्व गहाण ठेवून त्यांनी चित्रपटासाठी लागणारं साहित्य खरेदी केलं. अन् 3 मे 1913 साली राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट मुंबईतील सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये त्यांनी प्रदर्शित केला. हा चित्रपट तयार करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. अगदी कलाकार गोळा करण्यापासून समाजाचा विरोध झेलेपर्यंत त्यांनी सर्वकाही सहन केलं. पण ते आपल्या ध्येयावर ठाम राहिले अन् चित्रपट तयार केलाच. विशेष म्हणजे हा पहिला चित्रपट तयार करण्यासाठी त्याकाळी त्यांना तब्बल पाच हजार रुपये इतका खर्च आला होता. पुढे त्यांनी मोहिनी भस्मासूर, बर्थ ऑफ श्री क्रृष्ण, सेतू बंधन, भक्त प्रल्हाद यांसारख्या 100 हून अधिक मूकपटांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्यामुळंच भारतात चित्रपट उद्योगाची सुरुवात झाली. आज १५१व्या जयंतीच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.