स्वरा भास्कर
मुंबई, 16 फेब्रुवारी : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या अभिनयापेक्षा वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. राजकीय घडामोडींवर ती नेहमी भाष्य करत असते. ट्विटर वरून वेळोवेळी निशाणा साधत असते. तिने काहीच चित्रपटात अभिनय केला असला तरी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. मध्यंतरी ती राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने चर्चेत आली होती. बऱ्याच काळापासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र आता ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. स्वरा भास्करने नुकतंच लग्न केल्याची घोषणा केली आहे. स्वरा भास्कर अनेकदा तिच्या राजकीय विचारांमुळे चर्चेत असते, पण आता तिच्या आयुष्यात ‘राजकीय एंट्री’ झाली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. काही काळापूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. पण आता स्वराने जानेवारीत झालेल्या लग्नाची घोषणा केली आहे. हेही वाचा - Rakhi Sawant: आदिल तुरुंगात जाताच एकत्र आल्या ‘जाने दुश्मन’; शर्लिनने राखीच्या गालावर किस करत दिलं फुल स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. स्वरा भास्करने काही काळापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची आणि फहादची संपूर्ण प्रेमकथा सांगताना दिसत आहे. दोघांनी 6 जानेवारी रोजी विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहाची नोंदणी केली आहे. लग्नानंतरच्या एका फोटोमध्ये स्वरा रडतानाही दिसत आहे.
एक व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले की, ‘कधीकधी तुम्ही ते संपूर्ण जगात शोधता, जे तुमच्या शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री सापडली आणि नंतर आम्ही एकमेकांची जाणीव झाली. फहाद अहमद तुझे माझ्या आयुष्यात मनापासून स्वागत आहे.’
स्वरा भास्करने आजपर्यंत सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावली आहे. एवढेच नाही तर ती ‘वीरे दी वेडिंग’, ‘निल बट्टे सन्नाटा’, ‘जहाँ चार यार’सारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकली आहे. तसेच ‘रसभरी’ वेब सीरिजमध्ये स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत दिसली होती. स्वरा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. अलीकडेच स्वरा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा भाग बनली होती. या प्रवासाचा एक भाग बनलेली स्वरा खूप चर्चेत आली. काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी तिच्यावर टीका केली. यावेळी काढलेले फोटोही अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. स्वरा भास्करने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सध्या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.