मुंबई, 25 ऑगस्ट- मनोरंजनसृष्टीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. सोशल मीडियावर सध्या ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेन्ड सुरु आहे. वारंवार प्रेक्षकांकडून हिंदी चित्रपटांवर आणि कलाकरांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.बॉलिवूड कलाकारांना, चित्रपटांना सपोर्ट करणाऱ्या इतर भाषिक कलाकारांनासुद्धा प्रचंड ट्रोल केलं जात आहे. दरम्यान आता मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्नील जोशीनं या वादात नकळत उडी टाकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेन्ड चांगलाच चर्चेत आहे. आम्ही हिंदी चित्रपट पाहणार नाही आणि पाहू देणार नाही असाही निश्चय काहींनी केला आहे. आमिर खानचा लाल चड्ढा, अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि तापसी पन्नूचा दोबारा या चित्रपटांना या ट्रेन्डचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान हिंदी चित्रपट आणि कलाकरांना पाठिंबा देणाऱ्या इतर कलाकारांनासुद्धा नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खानसोबत फोटो शेअर करत त्याच्या लाल सिंह चड्ढाला पाठिंबा दिल्याबाबत मराठमोळे गायक राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल देशपांडे यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता मराठी अभिनेता स्वप्नील जोशीसोबतसुद्धा असंच काहीसं झालं आहे. स्वप्नीलने एक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे. वास्तविक स्वप्नील जोशीनं बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट लिहली आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग चांगलाच भडकला आहे. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘सोपी, वास्तविक, जादुई… तुम्ही लोक जी कोण आहात त्याचं कारण तुम्हीच आहात.. खऱ्या अर्थाने सुपरस्टार… अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांच्या प्रेमासाठी धन्यवाद ‘.
**( हे वाचा:** Boycott Bollywood मध्ये कपिल शर्माची एन्ट्री; प्रेक्षकांना दिला मोठा सल्ला ) अभिनेत्याची ही पोस्ट त्याच्या काही चाहत्यांना मोठ्या प्रमाणात खटकली आहे. नेटकरी यावर जोरदार कमेंट्स करत आहेत. एकाने कमेंट करत लिहलंय, स्वप्नील तुलाही बॉयकॉट व्हायचंय का?, तर दुसऱ्याने लिहलंय, ‘आजपासून मी स्वप्नीलचा एकही चित्रपट पाहणार नाही’, जी इंडस्ट्री तुम्हाला उभी करते तिथेच तुम्ही असे वागता’. तर काहींनी असंही म्हटलंय, साऊथ सोडून सगळे कलाकार एकाच माळेचे मणी आहेत. घर-गड्याची भूमिका मिळेल इतकीच अपेक्षा करायची कशाला किंमत कमी करुन घ्यायची अशा अत्यंत तिखट कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.