अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुंबई, 02 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. त्याला जाऊन आज 17 दिवस झाले मात्र अद्याप त्याने आत्महत्या का केली याबाबत पोलिसांना सुगावा लागलेला नाही आहे. तपास आणि त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट याच्या आधारावर सुशांतने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र बॉलिवूडमधील काही कलाकार आणि सुशांतच्या चाहत्यांनी याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. ही आत्महत्या नसून सुशांत नेपोटिझमची शिकार झाल्याचा आरोप या सर्वांकडून करण्यात येत आहे. दरम्यान नुकताच अभिनेता शेखर सुमन यांनी देखील असा दावा केला आहे की, सुशांतने आत्महत्येपूर्वी 50 वेळा सिमकार्ड बदलले होते. शेखर यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. (हे वाचा- सुशांतच्या आत्महत्येवेळी घरात होता त्याचा मित्र, पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी ) दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत 30 जणांची चौकशी करण्यात आली आहे. तरी देखील कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होत असल्याने सुशांतच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरितच आहे. मंगळवारी सुशांतचा त्याच्याबरोबर शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’मध्ये ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, त्या संजना सांघीची चौकशी करण्यात आली. संजनाची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली होती. सुशांतचे कुटुंबीय, सिद्धार्थ पिठानी, त्याचा केअर टेकर दीपेश सावंत, सुशांतची जवळची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती, YRF चे कास्टिंग डिरेक्टर इ. अशा एकूण 30 जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आले आहेत. (हे वाचा- सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील अभिनेत्रीने मुंबई सोडली?इन्स्टाग्रामवर दिले संकेत ) 14 जूनच्या दुपारी सुशांतच्या आत्महत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. 34 वर्षीय या हुशार कलाकाराने एवढे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वज जण हळहळले होते. 15 जून रोजी सुशांतवर मुंबईतील विले पार्ले याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पोस्टमार्टम अहवालानुसार त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र अनेकांनी या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बॉलिवूड क्वीन कंगना रणौत, दिग्दर्शक शेखर कपूर, अनुभव सिन्हा, सुशांतच्या हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी आणि अभिनेता रणवीर शौरी यांची वक्तव्य असेच संकेत देत आहेत की, सुशांत नेपोटिझमची शिकार झाला. अभिनेत्री आणि भाजप नेता रूपा गांगुली यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
या कलाकारांनी सोशल मीडियावर देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक चाहत्यांनी देखील सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची अजून हवी तशी सखोल चौकशी होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एक आणि भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांनी देखील सुशांतची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील असा सवाल उपस्थित केला होती की, छिछोरे हिट झाल्यानंतर सुशांतने 7 मुव्ही साइन केल्या होत्या मात्र त्या त्याच्या हातातून निसटल्या. असा प्रकार का घडला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान आतापर्यंत 30 जणांचे जबाब नोंदवून घेतले गेले आहेत, काहींची पुन्हा एकदा चौकशी देखील होत आहे. तरी देखील पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने चाहते, सुशांतचे कुटुंबीय आणि त्याच्या सहकलाकारांनी निराशा व्यक्त केली आहे. संपादन - जान्हवी भाटकर