राहुल देशपांडे
मुंबई, 20 ऑक्टोबर : सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दीपोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यकम आयोजित करण्यात आले आहे. भाजपच्या वरळी येथील सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी यासंबंधी ट्विट करत याचा जाहिर निषेध व्यक्त केला आहे. सोबतच त्यांनी कार्यक्रमातील तो प्रसंग शेअर करत “हाच का मराठी कलाकारांचा सन्मान ?”, असा प्रश्न देखील विचारला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून याप्रकरणी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मराठी दांडीयाच्या भव्य कार्यक्रमानंतर भाजपनं दिवाळीनिमित्त वरळीच्या जांबोरी मैदानात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिक केला आहे. या कार्यक्रमात काल 19 सप्टेंबरला संध्याकाळी गायक राहुल देशपांडे यांचं गायन सुरू होतं. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्या ठिकाणी आला. अभिनेता आल्यानं भाजप नेत्याने राहुल देशपांडेला तात्काळ गाणं थांबवण्यास सांगितलं आणि गाण अर्ध्यावर थांबवून भाजप नेत्यानं टायगर श्रॉफचा सत्कार केला. हेही वाचा - 68th National Film Awards: ‘माझ्यासह घरच्यांच्याही डोळ्यात पाणी..’, राहुल देशपांडे झाले भावुक ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण प्रकार व्यवस्थित पाहायला मिळत आहे. “हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा”, असं लिहित व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, राहुल देशपांडे त्याच्या गाण्याची सुरूवात करत असताना भाजपचे नेते अभिनेता टायगर श्रॉफला घेऊन मंचाच्या दिशेने येतात आणि गाणं थांबवा असं सांगतात. कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणारा अभिनेता पुष्कर श्रोत्री आपण पाच मिनिटांचा ब्रेक घेऊया अशी घोषणा करतो. तेव्हा राहुल त्याला “1 मिनिटं किंवा 2 मिनिटं नाही माझं गाणं होईपर्यंत ब्रेक नाही. नाहीतर मी गाणार नाही. त्यांना 20 मिनिटं थांबायला सांगा मी 20 मिनिटात माझं गाणं संपवतो नाही तर मी उठतो”, असं म्हणतात. त्यानंतर काही लोक राहुलला समजावताना दिसत आहेत. मात्र “हे मला आधी सांगायला पाहिजे होतं. मी आता गाणार नाही”, असं म्हणून राहुल देशपांडे स्टेजवरून उठतात.
घडलेल्या प्रकाराबाबत भाजपनं माफी मागावी किंवा दिलगिरी व्यक्त करावी. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा अपमान करणं हा राहुल देशपांडेचा अपमान आहे. कार्यक्रमात मराठी कलाकारांची चेष्टा होत आहे, असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे