Shivani Baokar
मुंबई, 13 ऑगस्ट : झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ मालिका प्रचंड गाजली होती. त्यातील आज्या आणि शितली यांच्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं होतं. मुख्यतः अतिशय वेगळ्या विषयामुळे ही मालिका लोकप्रिय झाली होती. ‘लागीर झालं जी’ ही मालिका वीर जवानांवर आधारित होती. या मालिकेमधील शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर. तिने साकारलेली शितली आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. त्यानंतर ती ‘कुसूम’ या मालिकेत देखील पाहायला मिळाली होती. आता अभिनेत्री शिवानी बावकरने एक स्तुत्य उपक्रम केला आहे. त्याची सगळीकडे चर्चा आहे. नुकताच आपण सर्वानी रक्षाबंधन साजरे केले, पण अभिनेत्री शिवानी बावकर हिने अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले आहे. आपल्या भावाला राखी बांधून सगळेच रक्षाबंधन साजरे करतात. पण दिवसरात्र डोळ्यात तेल घालून असल्या देशवासियांचं रक्षण करणारे सैनिक रक्षाबंधनाला बहिणीच्या राखीला मुकतात. शिवानी बावकरने हीच गोष्ट लक्षात घेऊन या रक्षाबंधनाला आपल्या सैनिक बांधवांना राखी बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता. काल तिने पुण्यात भारतीय आर्मीच्या जवानांसोबत राखी पौर्णिमा साजरी केली.
शिवानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये तुमच्या मनातल्या भारतीय आर्मी बद्दलच्या भावना कमेंट करून सांगायच्या होत्या, बेस्ट कॉमेंट्स मधून पाच मुलींना तिच्यासोबत आपल्या फौजी बांधवांना राखी बांधण्याची संधी मिळणार होती. काल या मुलींना सोबत घेऊन हा उपक्रम पार पडला. हेही वाचा - Mazhi Tuzhi Reshimgaath : अखेर यशसमोर येणार अविनाशचं सत्य; मालिकेत जबरदस्त ट्विस्ट शिवानीने तिच्या इंस्टाग्रामवर सैनिक बांधवांसोबतचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना हि माहिती दिली आहे. हि पोस्ट शेअर करताना तिने, ‘डोळ्यात तेल घालून, आपला जीव धोक्यात घालून, अहोरात्र देशवासीयांचं रक्षण करणा-या भारताच्या वीर जवानांना राखी बांधण्याची संधी मिळाली, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते.’ या शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या उपक्रमाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पोस्टवर देखील चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या उपक्रमासाठी तिने सोशल मीडियाचा डीपी सुद्धा बदलून ‘इंडियन आर्मी’ असा ठेवला आहे. ‘लागीर झालं जी’ मालिकेचा लेखक, दिग्दर्शक तेजपाल वाघसोबत मिळून शिवानीने हा उपक्रम केला आहे.