शर्मिष्ठा राऊत नवीन मालिका
मुंबई, 17 जुलै : अभिनय क्षेत्रातील बरीचशी मंडळी आता दुसऱ्या क्षेत्रातही काम करू लागली आहेत. कोणी स्वत:चा व्यवसाय करतंय. कोणी आपलं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. तर अनेक जण निर्मिती क्षेत्रात उतरू लागले आहेत. अशाच एका अभिनेत्रीनं काही महिन्यांआधी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. ती अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत. ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या शर्मिष्ठानं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘अबोली’ या मालिकेत काम करत असताना तिनं अचानक मालिकेतून एक्झिट घेतली अन् स्वत: प्रोडक्शन हाऊस सुरू केल्याची गुड न्यूज तिनं चाहत्यांना दिली. निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या या अभिनेत्रीला अभिनयाची ओढ सतावत असल्याने तिनं पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. शर्मिष्ठा राऊत नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ‘सारं काही तिच्याचसाठी’ असं तिच्या नव्या मालिकेचं नाव आहे. झी मराठीवर ही नवी मालिका सुरू होत आहे. दोन बहिणींचा हृदयस्पर्शी प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. हेही वाचा - आणि काय हवं! 10 वर्ष वाट पाहिली;अखेर उमेश-प्रियाने दिली गुड न्यूज, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव शर्मिष्ठानं टेलिव्हिजनवरील मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘उंच माझा झोका’, ‘आज काय स्पेशल’, ‘अबोली’ सारख्या मालिकेत तिनं काम केलं आहे. त्याचप्रमाणे ‘योद्धा’, ‘चि व चि. सौ. का’, ‘रंगकर्मी’ सारख्या मराठी सिनेमात तिनं काम केलं आहे. शर्मिष्ठानं मार्च 2023मध्ये एरिकॉन टेलिफिल्म्स या तिच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली. शर्मिष्ठ आणि तिचा नवरा तेजस देसाई या संस्थेचे मालक आहेत.
शर्मिष्ठाच्या एरिकॉन टेलिफिल्म्स या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही त्यांची पहिली मालिका सुरू झाली. झी मराठीवर रात्री 8 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार, कविता लाड प्रमुख भूमिकेत आहेत.
निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलेली शर्मिष्ठा आता अभिनय क्षेत्राला रामराम ठोकणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र तिच्या नव्या मालिकेच्या प्रोमोनंतर ती पुन्हा कमबॅक करतेय हे समोर आलंय. मालिकेत दोन दुरावलेल्या बहिणींची कथा पाहायला मिळणार आहे. मालिकेत शर्मिष्ठा संध्या हे पात्र साकारत आहे. तर अभिनेत्री खुशबू तावडे उमा हे पात्र साकारत आहे.