शाहिद कपूर
मुंबई, 05 जून: शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने स्वतःच्या हिमतीवर व आपल्या अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलंय. वडील पंकज कपूर हे देखील एक अभिनेते असल्याने शाहिदला बॉलिवूडमध्ये काम मिळणं, सहज शक्य झालं असेल, असं अनेकांना वाटतं; पण, ते खरं नाहीये. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने स्वतःला ‘सेल्फ मेड’ म्हटलं होतं. तसंच त्याने नेपोटिझमसंबंधी वादावर आणि प्रिव्हिलेज्ड स्टार किड्सबद्दल त्याचं मत मांडलं. या संदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिलंय. ‘बॉलिवूड बबल’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला, “मी अशा सेल्फ मेड मुलांपैकी एक आहे, ज्याच्याबद्दल लोकांना वाटतं की त्याचे वडील अभिनेते असल्याने त्याला सर्व सहज मिळालं असेल. पण लोकांच्या या समजाबद्दल मला फार वाईट वाटतं. ‘तुम्हाला माझा संघर्ष माहीत नाही,’ असं मला लोकांना सांगावं वाटतं." शाहिदचे वडील पंकज कपूर व त्याची आई नीलिमा अझिम हे दोघंही बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आहेत.
वडील पंकज कपूर खूप स्वाभिमानी आहेत, त्यामुळे त्यांनी करिअरमध्ये कधीच मदत करून त्याला कमकुवत बनवलं नाही, असंही शाहिदने नमूद केलं. “माझे वडील पंकज कपूर आहेत याचा अर्थ असा नाही की माझ्यासाठी काम मिळवणं सोपं होतं. कारण मी त्यांच्यासोबत राहिलोच नाही. मी माझ्या आईसोबत राहत होतो. माझे वडील फार स्वाभिमानी व्यक्ती आहेत. ‘मी या व्यक्तीला फोन करतो, तू त्याला भेटून ये’ असं ते कधीही म्हटले नाहीत. ते तसे नव्हते. मी स्वतःचा संघर्ष स्वतः केला. त्यामुळे मागच्या 20 वर्षांमध्ये मी खूप काम केलं. हा फक्त अभिनयाचा कार्यकाळ आहे. त्यापूर्वी मी 16 किंवा 17 वर्षांचा असल्यापासून असा जवळपास पाच वर्षांचा खडतर प्रवास होता,” असं शाहिद पुढे म्हणाला. Rekha Biggest Cat Fight: फक्त जया बच्चनच नाही तर या अभिनेत्रींचीही होती रेखाशी कट्टर दुष्मनी; काय होतं यामागचं कारण? शाहिदने शामक डावरच्या डान्स ग्रुपमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलंय. त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून ‘ताल’ आणि ‘दिल तो पागल है’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. वयाच्या 22 व्या वर्षी ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं होतं. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या कामाचं समीक्षकांनी कौतुक केलं आणि चित्रपटांनी चांगली कमाईही केली. या आठवड्यात त्याचा ‘ब्लडी डॅडी’ हा अॅक्शनपट रिलीज होणार आहे.