मुंबई, 25 जून- बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याबाबत ट्विट करत वादात अडकले आहेत. त्यांच्याबाबत हैद्राबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.हैद्राबाद पोलिसांनी शुक्रवारी, 24 जून रोजी सांगितले की ते लवकरच चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल फौजदारी गुन्हा नोंदवणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते जी नारायण रेड्डी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस निरीक्षक बी प्रसाद राव यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हटलं, “आमच्याजवळ तक्रार आली आहे. जी आम्ही कायदेशीर पडताळणीसाठी पाठवली आहे. कायदेशीर अभिप्राय मिळाल्यानंतर आम्ही राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करू’’. **(हे वाचा:** लैंगिक छळ प्रकरणात कोरियोग्राफर गणेश आचार्यला जामीन मंजूर; महिला डान्सरने केले होते धक्कादायक आरोप ) जी नारायण रेड्डी यांनी पोलिसांनी एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे. दिग्दर्शकाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कायदेशीर अभिप्राय घेतल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. भाजप आमदार टी राजा सिंह यांनीही राम गोपाल वर्मा यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविरोधात अशी टिप्पणी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
राम गोपाल वर्मांचं स्पष्टीकरण- दिग्दर्शकाने आपल्या वादग्रस्त ट्विटनंतर आणखी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलंय, ‘‘कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. द्रौपदी हे महाभारतातील माझं आवडतं पात्र आहे. परंतु हे नाव फारच दुर्मिळ आहे. मला त्या पात्राची आठवण झाली आणि मी हे ट्विट केलं’.