प्रियांका चहर चौधरी
मुंबई, 16 फेब्रुवारी : ‘बिग बॉस 16’ संपला असला तरी त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावेळी पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तर मराठमोळा शिव ठाकरे या सीझनचा उपविजेता ठरला. जवळपास 19 आठवडे म्हणजेच 135 दिवस चाललेल्या या शोने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या सीझनचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. विजेत्याबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते. पण एमसी स्टॅन जिंकताच प्रेक्षकांसह बिग बॉसच्या स्पर्धकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला. बिग बॉसचे माजी स्पर्धक अंकित गुप्ता आणि गौतम विज यांनी खुलेपणे नाराजीही व्यक्त केली होती. आता प्रियांका चहर चौधरीची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉसच्या अख्या सीझनमध्ये प्रियांकाचं नाव चर्चेत राहिलं. या घरातून तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली. शिवाय पहिल्या दिवसापासून तिची खेळीसुद्धा जबरदस्त होती. यामुळेच प्रियांकाचं ट्रॉफी जिंकणार असा अंदाज सगळ्यांनीच बांधला होता. मात्र निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या या भविष्यवाणीला खोटं ठरवलं आणि प्रियांकाला टॉप 2 मधूनही बाहेर काढलं. त्यामुळे प्रियांकाचे चाहते सध्या प्रचंड नाराज आहेत. नुकतंच पापाराझींनी तिला एमसी स्टॅन बद्दल प्रश्न विचारला आणि तिच्या उत्तराने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. हेही वाचा - Shiv Thakare : जिंकलस भावा! शिव ठाकरेच्या स्वागतासाठी अमरावतीत तुफान गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात काढली जंगी मिरवणूक बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर प्रियांकाला नुकतंच पापाराझींनी घेरलं. त्यावेळी त्यांनी तिला एमसी स्टॅनविषयी प्रतिक्रिया विचारली. सुरुवातीला तिने तिला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाविषयी प्रतिक्रिया दिली. “माझ्यावर असाच प्रेमाचा वर्षाव करत राहा. प्रेम जितकं मिळेल तितकं कमी असतं”, असं ती म्हणाली. त्यानंतर तिला एमसी स्टॅनविषयी विचारलं असता पुढे म्हणाली, “एमसी स्टॅन अमेझिंग आहे, त्याची पर्सनॅलिटी खरी आहे.” इतकंच बोलून ती तिथून निघून गेली.
प्रियांकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘एमसी स्टॅनला प्रसिद्धी मिळाली म्हणून सगळे त्याला पसंत करत आहेत. नाहीतर आधी त्याला कोणी विचारत पण नव्हतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘एमसी स्टॅनच्या नावाचा उल्लेख झाला तर मूड बदलला आणि ती निघून गेली’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘बिचारीचा जळफळाट होत असेल पण तरीही चांगलं बोलावं लागत असेल’, असंही एका युजरने लिहिलं आहे.
बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भनोट यांच्यामध्ये चुरस रंगली होती. स्टॅन या सिझनचा विजेता ठरला. तर शिव ठाकरे आणि प्रियांका हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते.