मुंबई, 9 जून : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकीचं पत्र देणाऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाला याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड (Vikram Barad) यानेच हे धमकीचं पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक या प्रकरणी तपास करत आहे. विक्रम बराडवर आतापर्यंत 24 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत. तो राजस्थानच्या हनुमानगढ येथील रहिवासी आहे. पण तो देशाबाहेर फरार असल्याची चर्चा असते. विक्रम बराड हा राजस्थानमधला कुख्यात गुंड आहे. त्याचे एन्काउंटमध्ये मारलेल्या गेलेल्या कुख्यात गुंड आनंद पाल याच्या अनमोल या भावासोबतही संबंध आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून विक्रम बराडला शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण विक्रम बराड हा भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशीदेखील माहिती समोर आली आहे. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना रविवारी (5 जून) धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची ( Mumbai Crime Branch) एक टीम तात्काळ दाखल झाली होता. ज्या ठिकाणी धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरु होता. सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राईम ब्राँचच्या टीमला सहकार्य करताना दिसला होता. ( पुणे-मुंबई-पुणे, भाजपच्या आजारी आमदाराला एअर लिफ्ट करणार? ) सलीम खान यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकीचं पत्र सापडलं होतं. सलीम खान वॉकला गेल्यानंतर दररोज जिथे रोज विश्रांती करतात तिथे एका बेंचवर हे पत्र सापडलं आहे. या पत्रात सलमान आणि सलीम खान दोघांना गंभीर धमक्या देण्यात आल्या आहेत. “मुसावला जैसा कर दुंगा”, अशा आशयाचं ते पत्र होतं. गेल्या आठवड्यात पंजाबी गायक ‘सिद्धू मूसेवाला’ (sidhu moose wala) याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे गँगस्टर लॉरेंस बिश्नोई असल्याची माहिती समोर आली होती. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ (salman khans security increase) करण्यात आली आहे. सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण लॉरेंस बिश्नोईने याआधी सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. लॉरेंसने सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेसचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2021मधील आहे. जेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेंस आणि त्याच्या गँगला देशातील वेगवेगळ्या राज्यातून मकोका केसअंतर्गत ताब्यात घेतलं होतं. या व्हिडीओमध्ये लॉरेंससह त्याचा साथीदार संपत देखील दिसत आहे. संपत हा लॉरेंसचा राजस्थानचा साथीदार आहे. संपतने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर रेकी केली होती. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.