मुंबई, 20 जुलै- अभिनेत्री पल्लवी पाटीलनं मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारुन आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. झी मराठी वाहिनीवरील नवी ‘मलिका नवा गडी नवं राज्य’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे. या मालिकेद्वारे पल्लवी पाटील पहिल्यांदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.पल्लवीसोबत या मालिकेत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेसुद्धा असणार आहे. पल्लवी पाटीलच्या भूमिकेबाबत सांगायचं तर, गावातून आपल्या आईं वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन आलेली मुलगी रामाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करते. तिच्या बाळाची आई होताना जणू प्रसव वेदना सहन करते आणि सासू हीच आपली आई आहे या विचाराने सासूला आपलंसं करण्याचा चंग बांधते. असं तिचं पात्र आहे. या मालिकेत पल्लवी पाटील आनंदीच्या भूमिकेत दिसणार असून, अनिता दाते रमाच्या भूमिकेत व रमाच्या मुलीच्या भूमिकेत ‘रंग माझा वेगळा’फेम बालकलाकार सायशा भोईर दिसणार आहे.
(**हे वाचा:** Bhau Kadam: भाऊ कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? आहे फारच ग्लॅमरस, करते ‘हे’ काम ) प्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल.छोट्या पडद्यावरचा हा नवा प्रवास पल्लवीसाठी एक मोठी संधी असणार आहे. मालिकेतील आनंदीची भूमिका साकारायला पल्लवी प्रचंड उत्सुक आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पल्लवीने म्हटलं, “मराठी चित्रपटात खूप शिकायला मिळालं आणि आता मला एक नवीन संधी मिळाली आहे, ती म्हणजे या सुंदर मालिकेत काम करण्याची. आनंदी हे पात्र रामाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते आणि सगळे आव्हान स्वीकारते. आनंदीचं पात्र साकारताना मला खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांनासुद्धा आनंदीचं पात्र आवडेल अशी अपेक्षा करते.” ‘नवा गडी नवं राज्य’ 8 ऑगस्टपासून, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठीवर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.