‘कबड्डी 4’ या नेपाळी चित्रपटाला सिक्कीममध्ये विरोध; काय आहे कारण?
नवी दिल्ली, 08 जून : ‘कबड्डी 4’ या नेपाळी चित्रपटाच्या (Nepali Film Kabaddi 4) प्रदर्शनाला सिक्कीमच्या (Sikkim) काही भागांमध्ये बौद्ध भिख्खूंनी विरोध केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. नेपाळमध्येही या चित्रपटाला बराच विरोध होतो आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, गंगटोक आणि नामचीमध्ये चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, यासाठी मुख्यमंत्री पी. एस. तमांग (Sikkim Chief Minister P. S. Tamang) यांना आवाहन करणार असल्याचं सिक्कीम लामा असोसिएशननं (Sikkim Lama Association) सांगितलं आहे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहून तशी मागणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास, लामा रस्त्यावर उतरतील, असं बौद्ध धर्मगुरू ओंडी पिंटो यांनी गंगटोकमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितलं. “हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास लामा रस्त्यावर उतरतील आणि चित्रपटगृहात तोडफोड झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही,” असं ते म्हणाले. पिंटो यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात दयांग राय यांनी साकारलेलं लामा (Lama) यांचं पात्र सगळ्या लामांच्या श्रद्धेवर घाला घालणारं आहे. “वास्तवात या चित्रपटातून बौद्ध धर्म आणि भिख्खूंवर अन्याय झाला आहे. त्याविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. नेपाळमध्येही या विरोधाचं समाधानकारक उत्तर मिळालं पाहिजे,” असं पिंटो यांनी सांगितलं. या चित्रपटाला सिक्कीमसोबत काठमांडूमध्येही चित्रपटाला मोठा विरोध झाला आहे. कबड्डी 4 या चित्रपटातली अभिनेत्री मिरुना मगरने एका साधूच्या कानशिलात लगावल्याच्या बातम्यांनंतर चित्रपटाची पोस्टर्स जाळण्यात आली. त्या साधूने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केलं होतं. हेही वाचा - Bhool Bhulaiyaa 2:चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये पोहोचताच अभिनेत्याने केलं होतं ‘हे’काम, जाणून व्हाल चकित गेल्या आठवड्यात 24 वर्षीय साधू फुरबा तमांग याला अटक करण्यात आली होती. काठमांडू मेट्रोपोलिटन सिटी-11 मधल्या एका मॉलमध्ये चित्रपट प्रचारादरम्यान त्याने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केलं होतं. त्या साधूला सोडून द्यावं व अभिनेत्रीनं बिनशर्त माफी मागावी, नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यानंतर लगेचच दोन्ही बाजूंकडून एकमेकांची माफी मागण्यात आली आणि प्रकरणावर पडदा पाडण्यात आला. काठमांडूच्या जिल्हा प्रशासनानं साधू तमांगला 3 हजार रुपयांच्या जामिनावर सोडून दिलं. चित्रपटाला होणारा विरोध नवा नाही. याआधीही भारतात अनेक चित्रपटांना विरोध झाला आहे; पण आता नेपाळी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून भारताच्या पूर्वेकडील सिक्कीम राज्यात विरोधाचं वातावरण आहे. त्या प्रदेशातल्या बहुसंख्य असलेल्या बौद्धधर्मीयांच्या श्रद्धेला तडा गेल्याच्या कारणावरून त्यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.