मुंबई, 10 एप्रिल- लॉकडाऊननंतर पुन्हा मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट भेटीला येत आहेत. पंडित वसंतराव देशपांडे (Vasnatrao Deshpande) यांच्या आयुष्यावर आधारित अभिनेता आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांचा ‘मी वसंतराव’ (Mee Vasantrao) सिनेमा नुकतंच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटात वसंतरावांच्या स्वभावाचे अनेक पैलू पाहायला मिळतात. गायक आणि अभिनेते राहुल देशपांडे यांनी ही भूमिका लीलया पार पाडली आहे. ‘मी वसंतराव’ हा चित्रपट निपुण अविनाश धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात वसंतराव देशपांडे यांच्या भूमिकेत त्यांचा नातू अर्थात गायक राहुल देशपांडे पाहायला मिळत आहे. वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आपल्याला पाहायला मिळते. पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर पाहायला मिळतो. तर अमेय वाघने साकारलेले दीनानाथ मंगेशकर तुम्हाला चांगल्या सुरांसोबतच वास्तवाची जाणीवही करून देतात.एकीकडे चित्रपटाचं तुफान कौतुक होत असताना. दुरीकडे अनिता दातेने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री अनिता दातेने (Anita Date-Kelkar) नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने आपल्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिलंय, ‘’“मी वसंतराव” हा आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला. ह्या चित्रपटात मला पंडित वसंतराव देशपांडे ह्यांच्या कणखर आई ची व्यक्तीरेखा साकारायला मिळाली. तुम्ही ह्या कामाचे, आमच्या चित्रपटाचे भरभरून कौतुक करीत आहात… तुम्हा सर्वांच्या या दिलखुलास प्रतिक्रियांसाठी मनापासून आभार! अजुनही ज्यांनी हा चित्रपट बघितलेला नाही त्यांनी नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहोचवा.तुमचं हे प्रेम आमचा उत्साह नेहमी वाढवत राहील’’. असं म्हणत अनिताने सर्वांचे आभार मानत आवाहनदेखील केलं आहे.
अभिनेत्री अनिता दाते हा मराठी इंडस्ट्रीमधील एक ओळखीचा चेहरा आहे. या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रियता मिळविली आहे. याआधी अनिताने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत राधिकाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. यासोबतच राधिकाने ‘चला हवा येऊ द्या’ मध्येसुद्धा काम केलं आहे.