पृथ्वीक प्रताप
मुंबई, 12 जुलै : महाराष्ट्राची हास्यजत्र या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप सध्या त्याच्या बेधडक आणि स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आपल्या नावावरून पृथ्वीकने केलेला खुलासा अनेकांच्या डोळ्यात अंजन घालून गेला. पृथ्वीक प्रताप सध्या अमेरिकेत गेला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमबरोबर पृथ्वीक अमेरिका दौऱ्यावर आहे. दौऱ्यादरम्यान संपूर्ण अमेरिका फिरत असताना पृथ्वीकनं आईच्या आठवणीत अशी एक कृती केली की ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. तसंच त्यानं एक खास पोस्ट देखील शेअर केली आहे. अमेरिकेच्या रस्त्यांवर पृथ्वीक प्रताप एक सुंदर हिरव्या रंगाच्या जरीची काठ असलेला कुर्ता घालून फिरताना दिसतोय. तो कुर्ता त्याच्यावर चांगलाच शोभून दिसतोय. पृथ्वीकनं घातलेला कुर्ता त्याच्यासाठी फार खास आहे. तो का खास आहे हे त्यानं त्याच्या पोस्टमधून सांगितलं आहे. पृथ्वीकनं परिधान केलेला कुर्ता हा त्याच्या आईच्या साडीपासून तयार करण्यात आला आहे. अमेरिकेत येण्याआधी त्यानं आईची आठवण सातासमुद्रापारही राहावी यासाठी खास कुर्ता शिवून घेतला. हेही वाचा - 42 दिवस लेकापासून दूर राहिली गायिका; दौऱ्याहून परत येताच झाली भावूक, Video अमेरिकेत येताच पृथ्वीकनं आईच्या साडीपासून शिवलेला कुर्ता परिधान करत अमेरिकेत येण्याआधीचा एका प्रसंग सांगितला. पृथ्वीकनं पोस्टमध्ये लिहिलंय, “अमेरिकेला येण्यासाठीची सगळी तयारी सुरू असताना आई अचानक म्हणाली ‘मला पण घेऊन चल ना अमेरिकेला’ आणि तिच्या या वाक्यावर तिला काय उत्तर देऊ हे मला कळेच ना”.
आईच्या या वाक्यानंतर पृथ्वीकनं आईला प्रतिकात्म रूपे अमेरिकत घेऊन जाऊ असं ठरवलं आणि तिच्या साडीपासून बनवलेला कुर्ता शिवला. पृथ्वीक म्हणाला, “न्यूयॉर्क शहर फिरत असताना आईच्या साडी पासून बनवलेला कुर्ता घातला आणि सगळं शहर पिंजून काढलं तेवढच आपलं आई आपल्या सोबत असल्याची फीलिंग”. इतकंच नाही तर ही पोस्ट शेअर करत पृथ्वीकनं “लवकरच आई ला अमेरिका वारी घडवेन त्यामुळे चिंता नसावी”, असं म्हणत आई तुला मिस करतोय असंही म्हटलं आहे.