कुशल बद्रिके
मुंबई, 1 नोव्हेंबर : विनोदाच्या मंचावर हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या अभिनेता कुशल बद्रिकेच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. कुशल कामाच्या निमित्ताने किंवा भटकंतीसाठी जिथे जातो तिथला एक तरी असा फोटो शेअर करतो ज्यामुळे सोशल मीडियावर कुशलची हवा असते. कुशलचा फोटो, त्याचे व्हिडिओ तर व्हायरल होत असतातच पण त्याच्या पोस्टची खासियत असते ती म्हणजे त्याने लिहिलेली कॅप्शन. नुकताच कुशलने एक फोटो शेअर केला आहे. यावेळीही त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं. नुकतीच आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली. यावर्षी दिवाळीचा उत्साह काही औरच होता. सगळ्यांनी अगदी धुमधडाक्यात कुठल्याही चिंतेशिवाय दिवाळी साजरी केली. यात मराठी कलाकार सुद्धा मागे नव्हते. त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने दिवाळ सण साजरा केला. आता कुशल बद्रिके ने सुद्धा दिवाळीची एक भन्नाट आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने बालपणीच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हेही वाचा - Gayatri Datar: गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; बिग बॉसनंतर पहिल्यांदाच मिळाली नवी मालिका कुशलने या पोस्टमध्ये फटाके फोडतानाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ‘‘ही एक खोडी मला बालपणापासून आहे, वात नसलेले आणि न पेटलेले “फटाके” गोळा करायचे आणि त्यातली दारू एकत्र करुन पेटवून द्यायची. त्याशिवाय माझी दिवाळी कधीच पूर्ण झाली नाही. आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही मला वाटतं’’
पुढे त्याने लिहिलंय कि, ‘‘दिवाळीचा फराळ संपल्यानंतर डब्बे नीट तपासून पाहिले तर तुकड्या तुकड्यात “चकली, शंकरपाळ्या” सापडतात ना! डब्याच्या तळाशी “करंजीचं सारण आणि अनारस्याच्या खसखस” मध्ये मिसळलेला जरासा “चिवडा” सापडतोच ना! तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात उरलेलं थोडसं “बालपण” आपल्याला सापडतच !!’ फक्त डबे नीट तपासून घ्यायला हवेत, तळाशी कुठेतरी असतच हे “बालपण” “अगदी लाडवातल्या “मनुक्या” एवढ का होईना, ते आपल्यात उरतच”अशा भावना कुशलने व्यक्त केल्या आहेत. कुशलने लिहिलेली हि पोस्ट चाहत्यांना चांगलीच भावली आहे. चाहत्यांसोबतच त्याच्या कलाकार मित्रांनी त्याच्या या पोस्टवर ‘किती छान लिहितोस’, ‘कुशल सर, कधी कधी वाटतं की तुम्ही चुकीच्या फील्ड मध्ये आहात…जरा अजून लक्ष दिले तर तुम्ही योगेश आणि निलेश चा जॉब खाऊ शकता….‘अशा कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ या शोबरोबरच कुशल ‘पांडू’ सिनेमात दिसला होता. तर ‘स्ट्रगलर साला’ वेब सीरिजमध्येही कुशलच्या अभिनयाचं कौतुक झालं. दिग्दर्शक विजू माने यांच्या सोबत कुशल काही ना काही व्हिडिओ बनवत असतो. तर कुशलच्या खाजगी आयुष्यातील गोष्टीही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. कधी आपली पत्नी सुनयनाबरोबरचा संवाद तो पोस्ट करतो. तर कधी मित्र विजू माने आणि तो मिळून काही तरी धमाल करतात. तो व्हिडिओ तो अपलोड करतो. चाहते नेहमीच कुशलच्या पोस्टची वाट पाहत असतात.