सिद्धार्थ आणि कियारा
मुंबई, 05 फेब्रुवारी: राजस्थानच्या जैसलमेरमचा सूर्यगड पॅलेस सध्या लग्नसराईने गजबजला आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत उद्या म्हणजेच ६ फेब्रुवारीला लग्न करणार आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सिद्धार्थ आणि कियारा चे चाहतेही या लग्नासाठी प्रचंड उत्सुक आहेत. काल कियारा सकाळी जैसलमेरला पोहचली तर सिद्धार्थ देखील कुटुंबियांसोबत काल रात्री लग्नस्थळी पोहचला. आता या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सिद्धार्थने 10 वर्षांत बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, कियारानेही केवळ काही चित्रपट करून इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. सिद्धार्थ हा दिल्लीचा रहिवासी आहे आणि त्याने 2012 मध्ये स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. याआधी काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ मुंबईत चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडत होता. दिल्लीत राहणारे सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा पंजाबी असून मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी आहेत. सिद्धार्थची आई गृहिणी आहे. हेही वाचा - Sidharth-Kiara Wedding : ‘त्या’ ठिकाणी पहिल्यांदा भेटलेले सिद्धार्थ-कियारा; ब्रेकअपपर्यंत आलेलं नातं कसं पोहोचलं लग्नापर्यंत कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरमध्ये उद्या विवाहबंधनात अडकणार आहेत. या गरबडीतच आता कियाराची सासू आणि सिद्धार्थच्या आईने होणाऱ्या सूनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राची आई रिमा मल्होत्रा, वडील, भाऊ हर्षद मल्होत्रा आणि वहिनी हे सगळे काल जैसलमेरला लग्नासाठी पोहोचले. शनिवारी जैसलमेर विमानतळावर सिद्धार्थ मल्होत्राची आई, भाऊ हर्षद आणि त्याची पत्नी हे तिघेही विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. सिद्धार्थ मल्होत्राच्या कुटुंबियांनीही पापाराझींच्या या शुभेच्छा मोठ्या आनंदाने स्वीकारल्या. त्याबरोबर त्यांचे आभारही मानले. यावेळी एका पापाराझीने सिद्धार्थच्या आईला कियारा अडवाणीबद्दल विचारले. ‘‘कियारा तुमची सून होणार आहे, तुम्हाला कसं वाटतंय?’’ असा प्रश्न पापाराझींनी सिद्धार्थच्या आईला विचारला. त्यावर त्यांनी ‘मी फारच उत्साहित आहे’ असे म्हटले. त्याबरोबरच सिद्धार्थ मल्होत्राचा भाऊ हर्षद यानेही त्यांच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘मी माझ्या भावाच्या लग्नासाठी फारच उत्सुक आहे,’ असेही त्याने यावेळी म्हटले.
दरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहे. मात्र याबद्दल कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला कियारा-सिद्धार्थने बुक केला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. या दोघांच्या शाही लग्नाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.