कंगना रणौत
मुंबई, 27 जानेवारी : शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ अखेर रिलीज झाला आहे. काही ठिकाणी विरोध होत असला तरी ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पठाणचे चाहते सगळीकडे उत्सव असल्यासारखं सेलिब्रेशन करत आहेत. बॉलीवूडचे अनेक कलाकार देखील शाहरुखच्या पठाणचं तोंडभरून कौतुक करत आहे. यात अभिनेत्री कंगना रणौत सुद्धा मागे राहिली नाही. पठाण चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित राहून तिने पठाणचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. आता मात्र ती आपल्या या विधानावरून पलटली असून तिने चित्रटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री कंगना रणौत आता ट्विटरवर परतली आहे. ती ट्विटरवर येऊन काही दिवस झाले आहेत आणि ती या प्लॅटफॉर्मवर प्रचंड सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिने आज काही ट्वीट केले आहेत, त्यात ती ‘पठाण’च्या यशाबद्दल बोलली आहे. तसेच शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट हिट झाला असला तरी देश ‘जय श्री राम’ चा जयघोष करेल, असं तिने म्हटलं आहे. भारताचे प्रेम आणि सर्वसमावेशकता शाहरुख खानच्या चित्रपटाला यश मिळवून देत आहे, असंही कंगना म्हणाली. हेही वाचा - 2 दिवसात Pathaanची अनपेक्षित कमाई; काश्मीर खोऱ्यातील थिएटर्स 32 वर्षांनी झाले हाऊसफुल्ल कंगना रणौतने ट्विट केले की, ‘पठाण द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्यांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर कोणाचे प्रेम? 80 टक्के हिंदू राहतात आणि तरीही आपला शत्रू देश पाकिस्तान आणि ISIS यांची चांगली प्रतिमा दाखवणारा पठाण नावाचा चित्रपट यशस्वीपणे चालू आहे. द्वेषाच्या पलीकडे असलेली ही भारताची भावना, त्याला महान बनवते…. भारताच्या प्रेमानेच शत्रूंच्या द्वेष आणि क्षुद्र राजकारणावर विजय मिळवला आहे. पण आशा ठेवणाऱ्यांनी कृपया लक्षात घ्या… पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो… पण इथे कायम फक्त जय श्री रामच्या घोषणा होतील.’
नुकतंच काही काळापूर्वी पठाणबाबत प्रतिकिया देताना कंगना रणौतने म्हटलं होतं कि, ‘पठाण चित्रपट चांगलं काम करत आहे… असे चित्रपट खरंच चालायला हवे… खासकरुन हिंदी सिनेमे मागे पडत आहेत. त्यामुळे लोकांनी त्या लेव्हलला जाणून प्रयत्न करायला हवेत’. कंगनाची ही प्रतिक्रिया सध्या जोरदार व्हायरल झाली होती. नेहमीच बॉलिवूडशी पंगा घेणारी कंगना शाहरुखच्या चित्रपटाचं कौतुक करत आहे हे पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या होत्या. आता मात्र कंगनाने पुन्हा एकदा तिचं मत स्पष्ट सांगितलं आहे.
शाहरुख खानचा ‘पठाण बॉक्स ऑफिस कलेक्शन’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 25 जानेवारी रोजी रिलीज झाल्यानंतर या अॅक्शन चित्रपटाने जगभरात 106 कोटी कमावले आहेत. शाहरुख, दीपिका आणि जॉनसोबत या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.