मुंबई, 23 एप्रिल- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी, किस्से, आठवणी समोर येत आहेत. लता मंगेशकर यांनी मृत्यूच्या काही महिने आधी आशा भोसले यांना एक खास साडी भेट दिली होती. त्याबद्दलची आठवण आशा भोसले यांनी एका कार्यक्रमात शेअर केली. डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सच्या (Dance India Dance Little Masters) आगामी एपिसोडमध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले प्रमुख (Asha Bhosle) पाहुण्या (Special Guest) म्हणून दिसणार आहेत. आशा भोसले यांनी त्यांची दिवंगत बहीण आणि दिग्गज गायिका लता मंगेशकर (legendary singer Lata Mangeshkar) यांच्यासोबत व्यतीत केलेल्या सोनेरी क्षणांच्या आठवणी या शोमध्ये सांगितल्या आहेत. त्याबद्दल प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. साहजिकच, या आठवणी सांगताना आशाताई भावूक झालेल्या दिसतात. या शोमध्ये आशा भोसले यांनी त्यांना लतादीदींकडून मिळालेल्या एका गिफ्टबद्दल सांगितलं. आशा भोसले यांना लतादीदींनी त्यांच्या निधनाच्या सहा महिने आधी एक खास भेट दिली होती. “आजपासून 5-6 महिन्यांपूर्वी लतादीदी मला म्हणाल्या होत्या, की मागून घे, आज लता मंगेशकरकडून तुला हवं असेल ते मागून घे. तेव्हा मी त्यांनी सही केलेली जुनी साडी मागितली आणि त्यांनी दिली. ही साडी माझ्यासाठी जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी संपत्ती आहे,” असं आशा भोसले म्हणाल्या. लता मंगेशकर यांच्याकडून मिळालेली ती साडी या कार्यक्रमात त्यांनी दाखवली. आशा भोसले यांनी त्याच्या लहानपणातला एक प्रसंग सांगितल्याचंही एका प्रोमोमध्ये दिसतं. लहानपणी लतादीदी आणि आपण घराजवळच्या गुलमोहराच्या झाडावर कसे चढून बसायचो किंवा दगड मारायचो, ते त्यांनी सांगितलं. लतादीदींचे लांब केस होते आणि त्यांच्या दोन वेण्या त्या घालायच्या. त्यामुळे लहानपणी त्यांची आई लतादीदींना ‘जाफराबादी म्हैस’ (jafrabaadi bhains) म्हणायची. लतादीदींना थांबवायचे असेल तर आम्ही बहिणी कधी-कधी त्यांच्या वेण्या ओढायचो, अशी आठवणही आशा भोसले यांनी सांगितली.
दुसर्या एका प्रोमोमध्ये असं दिसतं, की आशा भोसले म्हणतात, “एकदा लतादीदी म्हणाल्या होत्या, की आई-वडील हे देवापेक्षाही मोठे आहेत, त्यामुळे आई-वडिलांचे पाय धुऊन ते पाणी प्यावं. त्या वेळी त्यांनी मला पाणी आणायला सांगितलं आणि त्या पाण्याने त्यांनी आईचे पाय धुतले. तिने माझ्या मोठ्या बहिणीला, मीनाला, ते पाणी प्यायला सांगितलं; पण तिने नकार दिला. म्हणून मी ते पाणी प्यायले.”आशा भोसले यांनी शोमध्ये लतादीदींच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या ऐकून शोचे इतर जज सोनाली बेंद्रे, मौनी रॉय आणि रेमो डिसूझा प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं.