हेमंत ढोमे
मुंबई, 21 नोव्हेंबर : मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून ओळखला जाणारा हेमंत ढोमे सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो नेहमीच काहीना काहीना अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. हेमंत ढोमे सध्या ‘सनी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित चित्रपट ‘सनी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला असून प्रेक्षकांना सिनेमा पाहण्यास रोखलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. मराठी सिनेमांचे शो रद्द केले जात आहेत. याबाबत हेमंत ढोमेने ट्विट करत खंत व्यक्त केली आहे. हेमंत ढोमेच्या नुकत्याच रिलिज झालेल्या सनी चित्रपटासाठी काही प्रेक्षकांनी तिकिट काढले मात्र शो कॅन्सल झाला. हा प्रकार घडल्यानंतर हेमंतने ट्विट करत म्हणलं, प्रेक्षकांना संदेश पाठवून कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत.
हेमंत ढोमेने पुढचं ट्विट करत म्हटलं, हिंदी सिनेमा चालतोय त्याला आमची काहीच हरकत नाही उलट मनापासुन शुभेच्छा आहेत आणि आनंद देखील आहे. कारण संपुर्ण चित्रपटसृष्टी साठी ती एक सकारात्मक गोष्ट आहे, पण यात आपल्याच महाराष्ट्रात आपला मराठी सिनेमा बाजुला पडतोय. पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत! मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच!
दरम्यान, सनी या सिनेमात घरापासून दूर राहिलेल्या व्यक्तींची कहाणी दाखवण्यात आली आहे. ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या चित्रपटाच्या प्रोमोलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दर्शवला होता. मात्र आता या चित्रपटासाठी स्क्रीन मिळणं अवघड झाल्याचं पहायला मिळतंय.