मुंबई,7 मे- ‘बिग बॉस’ (Bigg Boss) मुळे चर्चेत आलेला होस्ट,निर्माता,दिग्दर्शक म्हणजे विकास गुप्ता (Vikas Gupta) होय. विकास सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. दरम्यान त्याने आपल्या खाजगी आयुष्याबाबत काही धक्कादायक खुलासेसुद्धा केले होते, ज्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. आज विकास आपला 34 वा वाढदिवस (Vikas Guptas’s 34 th Birthday) साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी. विकास गुप्ताचा जन्म 7 मे 1988 रोजी डेहराडून येथे झाला होता.तो एक निर्माता, क्रिएटिव्ह डायरेक्टर, पटकथा लेखक आणि होस्टदेखील आहे. त्याने अनेक रिऍलिटी शो केले आहेत. दरम्यान बिग बॉस 11 आणि बिग बॉस 14 मुळे तो चांगलाच प्रसिद्धीत आला होता. तसेच ‘भाभीजी घरपर हैं’ फेम अंगुरी भाभी अर्थातच अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या वादामुळेसुद्धा तो चर्चेत होता. या दोघांचा वादविवाद बिग बॉसच्या घरातसुद्धा पाहायला मिळाला होता. छोट्या पडद्यावर विकास गुप्ताला एक हुशार निर्माता आणि क्रिएटिव्ह व्यक्ती समजलं जातं. त्याला टीव्हीचा मास्टरमाइंडही म्हटलं जातं. विकासने 2010 मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर, एकता कपूरला त्याचं काम फार आवडलं आणि तिने विकासला बालाजी टेलिफिल्म्समध्ये क्रिएटिव्ह हेडचे पद देऊ केलं. त्यानंतर विकासने ‘सास भी कभी बहू’सारखे अनेक शो यशस्वी केले. काही वर्षांनंतर विकास गुप्ताने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस ‘लॉस्ट बॉय प्रॉडक्शन’ सुरू केलं. त्याच्या बॅनरखाली ‘गुमराह’, ‘ये है आशिकी’ सारखे अनेक शो बनविण्यात आले. विकास त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत होता. विकासने स्वतःबद्दल एक मोठा खुलासा करत, सत्य सांगण्याचं धाडस केलं होतं. विकास गुप्ताने जून 2020 मध्ये इन्स्टाग्राम पोस्ट करून आपण बायसेक्शुअल असल्याचं उघड केलं होतं. या खुलाशानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सोडून दिलं होतं. त्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता. एका मुलाखतीत विकासने सांगितले होते की, ‘माझी आई आणि भावाने घर सोडले कारण मी सर्वांसमोर माझे बायसेक्शुअल असल्याचे उघड केले होते. माझ्या कुटुंबाला याची खूप लाज वाटते’.त्यांनतर सर्वच थक्क झाले होते.
मात्र, या आरोपांनंतर विकास गुप्ताची आई शारदा गुप्ता म्हणाल्या होत्या की, ‘आम्ही विकासपासून दूर झालो आहोत, मात्र याचे कारण बायसेक्शुअल असणं मूळीच नाही. ही गोष्ट सार्वजनिक होण्यापूर्वीच आमचे नाते संपुष्टात आले होते. आम्हाला त्याच्याबद्दल आधीच माहित होते पण तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर प्रेम केले आणि त्याला स्वीकारले’.