गांधी गोडसे टीझर
मुंबई, 02 जानेवारी : महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सिनेमे येऊन गेले. मात्र आता येऊ घातलेल्या ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमाच्या नावावरुनच सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘घायल’, ‘दामिनी’, ‘अंदाज अपना अपना’ सारख्या सिनेमांनंतर राजकुमार संतोषी हे पहिल्यांदा गांधी गोडसे सारख्या विषयाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सिनेमाचं पहिलं पोस्टर काही दिवसांआधी प्रदर्शित झालं. त्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्षा जास्त न ताणता गांधी गोडसे सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सिनेमात नथुराम गोडसे यांच्या प्रमुख भूमिकेत आहे. गांधी गोडसे सिनेमाचं पहिला पोस्टर 27 डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आलं होतं. 2 डिसेंबरला सिनेमाचा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याच्या भरभरून प्रतिसाद दिला आहे. गांधी गोडसे हा सिनेमा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात महात्मा गांधी यांची भूमिका अभिनेते दीपक अंतानी यांनी साकारली आहे तर अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसे साकारत आहे. हेही वाचा - Chinmay Mandlekar: बिट्टा कराटे नंतर चिन्मय मांडलेकर साकारणार नथुराम गोडसेची भूमिका; फर्स्ट लूकने वेधलं लक्ष
गांधी गोडसे सिनेमात धमाकेदार डायलॉग असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. सिनेमाची कथा ही 1947-48 काळातील आहे. अभिनेता चिन्मय आणि दीपक अंतानी यांच्याबरोबरचं सिनेमात अरिख जाकारिया आणि पवन चोप्रा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहे. तनीषा संतोषी आणि अनुज सैनी हे 2 कलाकार सिनेमातून डेब्यू करत आहेत. सिनेमाला एआर रहमान यांनी म्युझिक दिलं आहे. पठाण आणि गांधी गोडसे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने सामने येणार आहेत.
अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा 25 जानेवारीला संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख पठाणमधून 4 वर्षांनी कमबॅक करतोय. पठाण सिनेमा प्रदर्शनाधीच वादात सापडला आहे. पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यात दीपिकानं घातलेल्या भगव्या बिकिनीवरून मोठा वाद निर्माण झाला. दोन वेगळ्या विषयाचे सिनेमे एकावेळी प्रदर्शित होत असल्यानं प्रेक्षक कोणत्या सिनेमाला प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.