Sairat fame Actor Arbaj Shaikh
मुंबई, 15 जुलै : सैराट (sairat) फेम सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेखला पुण्यातील रिक्षाचालकाकडून त्रास सहन करावा लागल्याची बातमी समोर आली आहे. अरबाजने स्वतः फेसबुक पोस्ट लिहीत त्याच्याबरोबर घडलेल्या प्रकारची माहिती उघड केली आहे. पुण्यातील रिक्षाचालकाने परिस्थितीचा फायदा घेत त्याच्याकडून अकारण जास्त पैसे घेतले तसेच त्याला शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. त्याबद्दल अरबाजने फेसबुक पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे. अरबाजने पुण्यातील नांदेड सिटी ते पुणे स्टेशन पर्यंत रिक्षा बुक केली होती. रिक्षाचे भाडे आधीच ठरले होते. मात्र ऐनवेळी त्याच्याकडून रिक्षाचालकाने जास्तीचे पैसे मागितले. या प्रसंगाबद्दल अरबाजने लिहिलं आहे कि, ‘बाहेर पाऊस असल्याने मित्र सोडायला येऊ शकत नव्हता. म्हणून त्याने मला Rapido या ऍप वरून नांदेड सिटी ते पुणे स्टेशन पर्यंत रिक्षा बुक करून दिली. त्याने 198 रुपये होतात असं सांगितलं. मी रिक्षात बसलो, पण त्याने मला खूप फिरवलं आणि वरती एक्स्ट्रा 60 रुपये मागायला सुरुवात केली. मी कारण विचारलं तर तो शिवीगाळ करू लागला. पैसे द्यायचे नसतील तर रिक्षातून उतर म्हणाला. पण माझ्याकडे त्याला पैसे देण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता.’ अशा शब्दात अरबाजने त्याच्या सोबत घडलेली घटना सांगितली आहे. हेही वाचा - Santosh Juvekar : ‘माफी मागतो मी वाचवू शकलो नाही’; अभिनेत्याबरोबर घडला धक्कादायक प्रसंग, ऐका त्याच्याकडूनच तसेच ‘माझ्यासारख्या पुण्यात राहणाऱ्या माणसाला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते तर गावाकडन आलेल्या लोकांचे काय हाल होत असतील.’ अशी खंत त्याने व्यक्त केली आहे. तसेच पुण्यातील यंत्रणेने यात लक्ष घालून रिक्षावाल्यांची आरेरावी थांबवावी अशी मागणीदेखील त्याने केली आहे. या फेसबुक पोस्टद्वारे त्याने एका मोठ्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. अभिनेता अरबाज शेख सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या गावचा रहिवासी असून तो सध्या पुण्यात राहत आहे. सैराटनंतर तो अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटात झळकला होता. मध्यंतरी त्याने झी मराठीच्या ‘मन झालं बाजींद’ या मालिकेत देखील भूमिका साकारली होती.