JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुकेश चंद्रशेखर आणि निक्की तांबोळी यांच्या भेटीमागील स्टोरी माहितेय का? गुन्हे शाखेनं केलं रिक्रिएट

सुकेश चंद्रशेखर आणि निक्की तांबोळी यांच्या भेटीमागील स्टोरी माहितेय का? गुन्हे शाखेनं केलं रिक्रिएट

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेहीसह अनेक अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरने केलेल्या फसवणुकीच्या बळी ठरल्या आहेत. या खंडणीप्रकरणातील तपासातून रोज नवनवे खुलासे होत आहेत.

जाहिरात

निक्की तांबोळी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 सप्टेंबर-   अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेहीसह अनेक अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरने केलेल्या फसवणुकीच्या बळी ठरल्या आहेत. या खंडणीप्रकरणातील तपासातून रोज नवनवे खुलासे होत आहेत. याच प्रकरणात जॅकलिनला सोमवारी (26 सप्टेंबर 2022) जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून खंडणीचं रॅकेट कसं चालवलं हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या तपासासाठी त्यांनी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. या संदर्भात झी न्यूजने वृत्त दिलंय.शनिवारी (24 सप्टेंबर) गुन्हे शाखेने सुकेश, अभिनेत्री निक्की तांबोळी आणि सोफिया सिंग यांच्यात तिहार तुरुंगाच्या आवारात (जेथे सुकेशला आधी ठेवण्यात आलं होतं) झालेल्या मीटिंग्ज रिक्रिएट केल्या. एएनआयशी बोलताना, आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष सी.पी. रवींद्र यादव यांनी खुलासा केला की ‘दोन अभिनेत्री सुकेश तुरुंगात असताना त्याला भेटायला गेल्या होत्या. यावेळी बोलताना सुकेशने त्यांना चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिकांची ऑफर दिली होती. सुकेश तुरुंगातून खंडणीचं रॅकेट कसं चालवत होता, याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आम्ही मीटिंग रिक्रिएट केली,’ असं यादव यांनी सांगितलं. “सुकेश तुरुंगातून त्याचं सिंडिकेट नेमकं कसं चालवू शकत होता, हे शोधणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणूनच आम्ही तिहार तुरुंगातील संपूर्ण सीन रिक्रिएट केला. निक्की तांबोळी आणि सोफिया सिंग या दोन अभिनेत्रींसह तो क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला. त्या सुकेशला 1 नंबरच्या जेलमध्ये भेटल्या होत्या व पिंकी इराणीने त्यांची सुकेशशी ओळख करून दिली होती,” असे रवींद्र यादव म्हणाले. “सुकेशने तुरुंगात संपूर्ण सेटअप तयार केला होता. आम्ही सुकेशच्या मोडस ऑपरेंडीचा प्रत्येक डिटेल रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. त्या कोणत्या गेटमधून आत आल्या? आणि त्या सुकेशला नेमक्या कुठे भेटल्या? हेही आम्ही रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आम्हाला कोर्टात बाजू मांडताना खूप मदत होईल. आम्ही या रिक्रिएशनची व्हिडिओग्राफीदेखील केली आहे आणि केसचा ड्राफ्ट तयार केला आहे,” असं अधिकारी पुढे म्हणाले. सुकेश आत्मविश्वास आणि पैशाने लोकांना फसवण्यात माहीर आहे, असं त्यांनी सांगितलं अधिकारी पुढे म्हणाले, “दोन्ही अभिनेत्रींनी सांगितलं, की त्यांना हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटला, होता पण तरीही सुकेश त्यांना फसवण्यात यशस्वी ठरला. तो ज्या आत्मविश्वासाने बोलतो, त्यामुळे लोकांचा त्याच्यावरचा संशय नाहीसा होतो आणि तो त्याच्या गोष्टी इतरांना पटवून देतो. त्याने अभिनेत्रींना चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका ऑफर करत फसवलं.”

“सुकेश स्वतःबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगायचा. काहींना त्याने तो मोठा निर्माता असल्याचं सांगितलं होतं, तर काहींना तो एका दाक्षिणात्य चॅनलचा प्रमुख असल्याचं सांगितलं होतं. त्याने तुरुंगातील कोठडी त्याचं ऑफिस असल्याचं म्हटलं होतं. त्याच्याकडे भरपूर पैसे होते, त्या पैशाच्या जोरावर तो लोकांना आमिष दाखवत असे आणि फसवणूक करत असे. तो तुरुंगातील कोठडीत चित्रपट बनवत आहे, असं त्याने अभिनेत्रींना सांगितलं होतं,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असून, कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. त्याला मदत करणाऱ्या काही तुरुंग अधिकाऱ्यांची नावंही समोर आली आहेत, असंही त्यांनी सांगितलं. “हे सर्व तुरुंगात सुरू होतं आणि काही तुरुंग अधिकारीही यात सामील होते. या प्रकरणात आणखी काही अभिनेत्री सामील आहेत. आम्ही कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही, आणि गरज पडल्यास या अभिनेत्रींना पुन्हा बोलावलं जाऊ शकतं,” असं त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. **(हे वाचा:** नेहा-फाल्गुनी वादात युजवेंद्र चहलच्या पत्नीची उडी; गाण्याबाबत हे काय बोलून गेली धनश्री? ) दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला सोमवारी दिल्लीती पटियाला हाऊस कोर्टातून 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मिळाला आहे. तर, 15 सप्टेंबर रोजी अभिनेत्री नूरा फतेही आणि तिची सुकेशशी ओळख करून देणाऱ्या पिंकी इराणीची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती.सुकेश चंद्रशेखरवर दिल्लीतील रोहिणी तुरुंगात असताना 200 कोटी रुपयांचं खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. त्याने तुरुंगात बंद असलेले रॅनबॅक्सी कंपनीचे माजी मालक शिविंदरसिंग यांची पत्नी आदितीसिंग यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी त्याने आपण केंद्रीय कायदा मंत्रालय आणि पीएमओतील अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. त्याने शिविंदरसिंग यांना जामिनावर बाहेर काढण्याचं आमिष दाखवत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. सुकेश चंद्रशेखर हा मूळचा कर्नाटकातील बेंगळुरूचा रहिवासी असून तो सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस, नूरा फतेही, निक्की तांबोळी, सोफियासिंग, चाहत खन्ना अशी बरीच नावं आतापर्यंत समोर आली आहेत. या सर्व अभिनेत्रींची चौकशी गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या