मुंबई, 24 एप्रिल- मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण 8 चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिखस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यानंतर आता ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 22 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे.या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.प्रसिद्ध ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाहीर केलं आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. तर जिजाऊंची भूमिका मृणाल कुलकर्णी, अफझल खानची भूमिका बॉलिवूड अभिनेते मुकेश ऋषी यांनी साकारली आहे. तानाजी मालुसरेची भूमिका अजय पूरकर, कान्होजी जेधे ही भूमिका समीर धर्माधिकारी तर दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईक साकारत आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकरही या चित्रपटातून नकारात्मक भूमिकेत झळकताना दिसत आहेत.