मुंबई, 20 ऑगस्ट- दीपिका पादुकोण-रणवीर सिंह बॉलिवूडमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याला प्रचंड पसंत केलं जातं. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ते सतत सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करुन चाहत्यांची मनं जिंकत असतात. लग्न झाल्यापासून दोघेही मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. पण दोघांनी नुकतंच अलिबागमधील त्यांच्या नवीन घरासाठी गृहप्रवेश पूजा आयोजित केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, गृहप्रवेशासाठी फक्त रणवीर आणि दीपिकाच्या कुटुंबीयांनीच हजेरी लावली होती. रणवीरने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर गृहप्रवेशाची झलक शेअर केली आहे.
काही वेळेपूर्वी रणवीर सिंहने आपल्या इन्स्टाग्रामवर गृह्प्रवेशाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने गृहप्रवेश आणि पूजेची झलक चाहत्यांना दाखवली आहे . रणवीर आणि दीपिका दोघांनीही गृह प्रवेश पूजेसाठी पांढऱ्याशुभ्र पोशाखांची निवड केली होती. या फोटोंमध्ये दोघेही जोडीने धार्मिक विधी करताना दिसले. पण कोणत्याही फोटोमध्ये दोघांचे चेहरे दिसत नाहीत. तरीसुद्धा हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते या दोघांना शुभेच्छा देत आहेत. शिवाय गोकुळाष्टमीदिवशी या दोघांच्या आयुष्यात आनंदी क्षण आल्याचा आनंददेखील व्यक्त करत आहेत.
दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कोणताही फोटो शेअर केलेला नाहीय. परंतु चाहते रणवीरने शेअर केलेल्या फोटोंचा आनंद घेत आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये दीपिका आणि रणवीर हातात-हात देऊन पूजेच्या विधी पार पाडताना दिसून येत आहेत. दरम्यान एका फोटोमध्ये रणवीर-दीपिका आपल्या नव्या घराचं दार उघडून गृहप्रवेश करताना दिसून येत आहेत.
**(हे वाचा:** Randeep Hooda B’day: कधी वेटर तर कधी टॅक्सी ड्रायव्हर बनून भरलं पोट; आज इतक्या कोटींचा मालक आहे रणदीप ) तसेच या वर्षी जुलैमध्ये, रणवीर सिंह आणि त्याचे वडील जुगजीत सुंदरसिंह भवनानी यांच्या मालकीच्या ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी नावाच्या फर्मने 119 कोटी रुपयांना मुंबईत एक अपार्टमेंट खरेदी करण्याचा करार केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, हा फ्लॅट इमारतीच्या 16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर विस्तारित आहे. हा एक सी व्ह्यू लक्झरी क्वाड्रप्लेक्स अपार्टमेंट आहे. या इमारतीत एकूण 19 पार्किंग स्लॉट आहेत.
अपार्टमेंटमध्ये 11,266 चौरस फूट कार्पेट एरिया आहे. इतकंच नव्हे तर 1,300 चौरस फूट इतक्या आकाराचा एक खास टेरेस आहे. रणवीर आणि त्याच्या वडिलांच्या फर्मने या व्यवहारासाठी एकूण 7.13 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. तर क्वाड्रप्लेक्ससाठी एकूण 118.94 कोटी रुपये भरण्यात आले आहेत. या सेलिब्रेटी कपलचं हे आलिशान घर प्रचंड चर्चेत आलं होतं.