रीना रॉय-मोहसीन खान
मुंबई, 17 मार्च- 70-80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री होत्या ज्यांनी आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानेही लोकांना वेड लावलं होतं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रीना रॉय होय. रीना रॉय यांनी त्याकाळात पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्न करुन मोठा वाद निर्माण केला होता. मात्र काहीच काळात दोघांचा घटस्फोटदेखील झाला. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव जन्नत असं आहे. क्रिकेटपटू मोहसीन खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रीना रॉयसोबतच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. मोहसीन खानने ‘झी स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्याने पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. कारण ही त्याची ओळख आहे. ते पुढे म्हणाले, ‘मला काहीच पश्चाताप नाही. मी एका मानवाशी लग्न केलं होतं. ती कोण होती किंवा ती कुठून होती हे मी पाहिलं नाही. पण मी ठरवलं होतं की, मी पाकिस्तानातच राहणार..असं म्हणत मोहसीन यांनी आपल्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. (हे वाचा: Rajpal Yadav B’day: लेकीला जन्म देताच झालेला पत्नीचा मृत्यू,पुढे 9 वर्षे लहान मुलीवर जडलं प्रेम, राजपाल यादवबाबत ‘त्या’ गोष्टी ) मोहसीनने पुढे म्हटलं, ‘कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण लग्नापूर्वी मी तिचा एकही चित्रपट पाहिला नव्हता. जेव्हा मी घराबाहेर पडत असे आणि टीव्हीवर अमिताभ बच्चन यांचा एखादा सीनचालू असला तर मात्र मी थांबून पाहात असे, याशिवाय मी कुठलाही चित्रपट पाहिला नाही. मी तिच्या सौंदर्याने कधीच प्रभावित झालो नाही. मला चांगले लोक आवडतात’.असंही त्यांनी म्हटलं आहे. रीना रॉयने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, मोहसिन खानच्या आयुष्याशी ताळमेळ राखता न आल्याने तिचा घटस्फोट झाला. मोहसिनची इच्छा होती की तिने लंडनमध्ये आपल्यासोबत राहावं आणि ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारावं. परंतु रीना त्यासाठी तयार नव्हती. रीनाने असंही सांगितलं होतं की, मोहसीन मुलीला तिच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण त्याला वाटत होते की जर रीनाने आपली मुलगी पाहिली तर ती त्याच्यासोबत लंडनला जाण्यास तयार होईल आणि तिथेच स्थायिक होईल’’.
रीनाने 1983 मध्ये मोहसिन खानसोबत लग्न केलं होतं. घटस्फोटानंतर अभिनेत्री 1992 मध्ये भारतात परतली होती.रीना यांनी मुलाखतीत असं सांगितलं होतं की, ती आजही एक्स-पती मोहसीन खानचा आदर करते कारण ते तिच्या मुलीचे वडील आहेत. आणि ती त्यांच्या संर्पकात असते.