शिव ठाकरे
मुंबई, 29 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय शो ‘बिग बॉस’च्या नव्या सीजनची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून आहे. यंदा बिग बॉसचा हा 16 वा सीजन असणार आहे. या लोकप्रिय आणि तितक्याच विवादित शोची लॉन्च डेट आता जवळ आलेली आहे. त्यानुसार आता मेकर्स शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रेटी स्पर्धकांच्या नावाचा खुलासा करत आहेत. ‘इमली’ फेम सुंबुल तौकीर, निम्रत कौरनंतर चॅनेलने सौंदर्या शर्मा आणि रॅपर एमसी स्टॅन यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीजनचा विजेता शिव ठाकरे बिग बॉस हिंदीमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता आणि अभिनेता शिव ठाकरेला निर्मात्यांनी बग बॉस हिंदीच्या 16 व्या सीजनसाठी ऑफर दिल्याचं सांगितलं जात आहे. या वृत्तानुसार शिव ठाकरे बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यास त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी मेजवानी ठरणार आहे. शिव ठाकरे मराठी इंडस्ट्रीमधील प्रचंड लोकप्रिय कलाकार आहे. बिग बॉस मराठीमुळे त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याला बिग बॉसच्या घरात पाहायला नक्की आवडेल यात काहीच शंका नाही.. शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा राहणारा आहे. त्याने फारच कमी वेळेत आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे शिवने एमटीव्हीवरील ‘रोडीज’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून टीव्हीवर पदार्पण केलं होतं. या शोमध्ये तो चांगलाच प्रसिद्धीस आला होता. या शोमध्ये शिव मेंटॉर रणविजय सिंगच्या टीमचा सदस्य होता.या शोनंतर शिवने ‘बिग बॉस मराठी’ च्या दुसऱ्या सीजनमध्ये एन्ट्री केली होती. या शोचा तो विजेतादेखील ठरला होता. त्याला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. या शोमध्ये शिव आणि मराठी अभिनेत्री वीणा जगताप यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
बिग बॉसच्या घरात त्यांनी आपलं प्रेम कबुल केलं होतं. शोमधील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. शोमधून बाहेर आल्यानंतरसुद्धा या दोघांचं नातं कायम होतं. (हे वाचा: Bigg Boss 16: सलमानला खरंच 1000 कोटीचं मानधन? पहिल्या स्पर्धकापासून भाईजानने उघड केली सर्व गुपितं ) हे दोघे सतत एकमेकांसोबत आणि एकेमकांच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येत होते. परंतु काही काळापासून या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत दोघांनी अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाहीय.शिव सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत विविध अपडेट्स चाहत्यांना देत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन प्रेम देत असतात. शिव अनेक व्हिडीओ अल्बममध्ये झळकला आहे. सध्या तो हिंदी बिग बॉसमुळे प्रचंड चर्चेत आला आहे.