अमृता सुभाष
मुंबई, 01 जुलै : सध्या ओटीटीचा जमाना आहे. मोठ्या पडद्यावर काम केलेले अनेक कलाकार या माध्यमात आपलं नशीब अजमावत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीचा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा सध्या हीट होत असून प्रेक्षकांकडून तिच्या अभिनयाचं कौतुक देखील होतंय. ही अभिनेत्री म्हणजेच अमृता सुभाष. अमृताने मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण केली आहे. सध्या ती ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटात झळकत आहे. नुकतीच तिने या चित्रपटातील तिची सहकलाकार असलेल्या अभिनेत्रींसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटात अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत अमृता सुभाष झळकत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत काजोल, तमन्ना भाटिया, मृणाल ठाकूर, कोंकणा सेन आणि नीना गुप्ता या अभिनेत्री देखील प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. या चित्रपटात स्त्रीच्या लैंगिक सुखाविषयीच्या गरजा या विषयावर भाष्य केलं आहे. सध्या या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. अशातच अमृता सुभाषने कोंकणा सेनविषयी एक खास पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये अमृताने म्हटलंय की, ‘या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पहात आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नं अखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादं प्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं. लस्ट स्टोरीज काल नेटफ्लिक्स वर रिलीज झाल्यापासून त्यातल्या आमच्या कथेला कालपासून इतकं प्रेम मिळतं आहे याच्या आनंदा इतकाच कोंकणासारखं माणूस आयुष्यात आलं साचा आनंद मोठा आहे.’ Kajol : ‘ती गोष्ट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग….’ स्त्रीसुखाविषयी स्पष्टच बोलली काजोल तिने पुढे लिहिलंय की, ‘मी मराठीत जास्त काम केलं असल्यानं हिंदीतली फार कमी माणसं मला माहीत आहेत. कुठल्याही हिंदीतल्या पार्टयांना गेलं की मला फारशी माणसं माहीतीची नसतात. कोंकणा अशा वेळांना माझा हात हातात घेऊन मला ओढत कुठेशी नेते आणि कुणाकुणाला माझ्याविषयी भरभरून काही सांगत रहाते. मधेच मी कुणाशी काय बोलावं हे न सुचून बाजूला उभं राहून माणसांना निरखत असते तेव्हा ही कुठुनशी अवतरते आणि विचारते,”ठीक आहेस ना? चल थोडा वेळ डान्स करुया?” डान्स सुरु झाला आहे कोको! खूप मजा येते आहे.. येत रहाणार आहे’ अमृताने कोंकणा सेनविषयी अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
अमृतानं वळू, श्वास, विहीर, हापूस,किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच गल्ली बॉय, धमाका या हिंदी चित्रपटांमुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. सेक्रेड गेम्स-2, बॉम्बे बेगम्स आणि सास बहू आचार प्रा. ली या वेब सीरिजमधील अमृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता तिची लस्ट स्टोरीज २ मधील भूमिका देखील चाहत्यांना चांगलीच भावत आहेत.