प्रातिनिधिक फोटो (साभार : सोशल मीडिया)
नेहाल भुरे, भंडारा, 14 ऑगस्ट : महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन आणि सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केला जातोय. पण तरीही काही केल्या या घटना कमी होताना दिसत नाहीय. या महिला अत्याचाराच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी न्याय व्यवस्था देखील सक्षमपणे उभी आहे. याची प्रचिती भंडाऱ्यातील नागरिकांना आली आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथे सहा वर्षापूर्वी संबंधित घटना घडली होती. मुकेश रमेश गायकवाड असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे. ( प्रियकराचा वाढदिवस प्रेयसीसाठी ठरला शेवटचा, आधी गळा चिरला, नंतर सांगितलं कारण… ) खैरीपट येथील अल्पवयीन मुलगी 5 ऑगस्ट 2016 रोजी वडसा येथे कॉलेजला जाते म्हणून घरून निघून गेली होती. मात्र, ती घरी परत आलीच नव्हती. तिच्या कुटुंबियांनी तिचा प्रचंड शोध घेतला. पण तरीही तिचा थांगपत्ता लागला नाही. मात्र, काही दिवसांत तिला मुकेश गायकवाड याने फूस लावून पळवून नेल्याची माहिती समोर आली. यावरून लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी मुकेश विरुद्ध गुन्हा नोंदवला होता. उपनिरीक्षक टी. जी. निंबेकर यांनी तपास करून मुकेश गायकवाड याला अटक केली. अखेर प्रकरणाचा तपास करुन साक्षी पुरावे गोळा करत प्रकरण भंडारा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. साक्षी पुराव्याअंती आरोप सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी आरोपी मुकेश गायकवाड याला दहा वर्षे सश्रम शिक्षा ठोठावली आहे.