JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Cyber Crime : एक मेसेज अन् महिलेचं अकाऊंट रिकामं; 'अशी' झाली लाखो रुपयांची फसवणूक

Cyber Crime : एक मेसेज अन् महिलेचं अकाऊंट रिकामं; 'अशी' झाली लाखो रुपयांची फसवणूक

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत, आरोपीने एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात

महिलेला लाखो रुपयांचा गंडा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 15 जुलै : अलीकडच्या काळात बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक, फ्रॉड किंवा हॅकिंगसारख्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. सायबर गुन्हेगार लिंक,ओटीपी किंवा कॉलच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत त्यांचे बँक अकाउंट रिकामे करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गुजरातमधल्या अहमदाबाद येथील एक महिला कुरिअर डिलिव्हरी स्कॅमला बळी पडली आणि तिच्या बँक अकाउंटमधल्या 1.38 लाख रुपयांवर स्कॅमरने डल्ला मारला.‘इंडिया टुडे’ ने या बाबत वृत्त दिले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 25 वर्षांची मितीक्षा सेठ ही फॅशन डिझायनर असून, तिने तिच्या ऑनलाइन पार्सलसाठी एका लिंकवर क्लिक केलं आणि तिची 1.38 लाख रुपयांची फसवणूक झाली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, सायबर क्राइम विभागाने लोकांना अशा स्कॅमबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे.  लोकांनी ओटीपी,पासवर्डसारखी कोणतीही गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये आणि पेमेंटसाठी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये,अशा सूचना सायबर क्राइम विभागाने दिल्या आहेत. अहमदाबादमधल्या प्रकरणात महिलेने फिशिंग लिंकवर क्लिक केल्याने स्कॅमर तिचं अकाउंट अ‍ॅक्सेस करू शकला. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. लोकांनी अज्ञात कॉल्स पासूनही सावध राहावे,असे सायबर क्राइम विभागाने सूचित केले आहे. `टाइम्स ऑफ इंडिया`ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणीने पालडी येथील एका टेलरला शिलाई करण्यासाठी कपडे दिले होते. या कपड्याच्या पार्सलची ती वाट पाहात होती. ऑर्डर पूर्ण झाल्यावर ती डिलिव्हरीसाठी पाठवली आहे, असे टेलरने या महिलेला कळवले. कॉल केल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी सुद्धा पार्सल न मिळाल्याने पीडितेने टेलरने दिलेल्या कुरिअरचा तपशील वापरून ऑर्डरचे ट्रॅकिंग सुरू केले. दरम्यान वेबसाईटवर पार्सलचे ट्रॅकिंग केल्यानंतर काही मिनिटांत,पीडित महिलेला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. या व्यक्तीने स्वतःची ओळख कुरिअर फर्मचा कर्मचारी म्हणून करून दिली. तुमचं पार्सल आमच्याकडे आहे आणि डिलिव्हरी फी भरल्यानंतर ते वितरित केलं जाईल, असं त्या व्यक्तीने महिलेला सांगितलं. त्याने या महिलेला पार्सलसाठी पाच रुपये शुल्क भरण्याची विनंती केली. कॉलरने पीडितेशी पेमेंटसाठी एक लिंक शेअर केली. त्यानंतर पीडितेने ओळख पटल्याने पाच रुपये दिले. मात्र पैसे भरल्यानंतर त्याने तिला पुन्हा एकदा वाढीव शुल्क म्हणून पाच रुपये भरण्यास सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेनं जेव्हा तिचं बँक खात चेक केल तेव्हा तिच्या खात्यामधून काही रक्कम गायब होती.  मी माझ्या मित्राला काही रक्कम पाठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये पुरेशी रक्कम नसल्याचे समजलं, असं पीडित महिलेनं सांगितलं. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पीडिता दुसऱ्या दिवशी बँकेच्या शाखेत गेली. तिने बँकेतून स्टेटमेंट घेतलं. त्यात 12 मे आणि 13 मे रोजी चार ट्रान्झॅक्शनमध्ये तिच्या अकाउंटमधून 1.38 लाख रुपये डेबिट झाल्याचं दिसून आलं. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच  पीडित महिलेने सायबर क्राइम हेल्पलाइनवर कॉल केला. त्यानंतर या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या