जयपूर, 19 नोव्हेंबर : राजस्थानमधील चूरू येथे आठ वर्षांपूर्वी लग्न झालेल्या महिलेला तिच्या सासरच्यांनी डायन म्हणत, मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. केवळ मारहाणच नाही, तर गावातील भर बाजारात तिला निर्वस्त्र करूनही मारहाण केली. पीडित महिलेने आता न्यायासाठी महिला सुरक्षा आणि सल्ला केंद्रात धाव घेतली आहे. डायन असल्याचं सांगत, चारित्र्यावर टीका केल्याचा आरोप महिलेने केला आहे. चूरू जिल्ह्यातील 25 वर्षीय महिलेचा आरोप आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिला डायन, बदमाश म्हणत, तिचं अन्न-पाणी बंद केलं. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, जर तिच्या मदतीसाठी कोणी पुढे आलं, तर सासरचे आणि गावातील लोक त्याला धमकी देतात. मदत करणाऱ्यांना बदनाम करण्याची धमकी दिली जाते. अखेर महिलेने मदतीसाठी महिला सुरक्षा आणि सल्ला केंद्रात धाव घेतली आहे.
महिला सुरक्षा आणि सल्ला केंद्राचे समुपदेशक यांनी सांगितलं की, जवळपास आठ वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न झालं आहे. पाच महिन्यांपूर्वी ही महिला आपल्या मुलीसह माहेरी आली होती. परंतु नंतर सासरी गेल्यावर, सासरच्या लोकांनी तिला ती डायन आहे असं म्हणत मारहाण केली आणि घरातून बाहेर काढलं. सासरच्या लोकांच्या उच्चतेमुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोपही महिलेने केला आहे. (वाचा - घरात लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असतानाच कुटुंबात सुरू झाला अंदाधुंद गोळीबार ) एकदा पोलिसांनी, त्यांच्या उपस्थितीत महिलेला घरात घ्यायला सांगितलं. परंतु घराच्या ज्या कोपऱ्यात ती राहत होती, तिथे कोणतीही सुविधा नव्हती. सासरचे लोक त्यांच्या मनाप्रमाणे, गावकऱ्यांना भडकवून, महिला राहत असलेल्या ठिकाणी दगडफेक करत असल्याचं, पीडितेने सांगितलं. आता महिला सुरक्षा आणि सल्ला केंद्र या प्रकरणी अधिक तपास करत आहे.