लखनऊ, 09 डिसेंबर : शरीरसंबंध म्हणजेच सेक्स ही मानवाची नैसर्गिक गरज आहे, मात्र काही व्यक्ती सेक्सबाबतीत एवढ्या आक्रमक असतात, की त्या स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसतात. उत्तर प्रदेशातल्या अमरोहा जिल्ह्यातल्या एका व्यक्तीच्या संदर्भात असंच घडलं. एका रात्री दोनदा शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने नकार दिल्याने 34 वर्षांच्या पतीने तिची हत्या केली. मोहम्मद अन्वर असं या व्यक्तीचं नाव आहे. अन्वरने रागाच्या भरात पत्नीचा दोरीने गळा दाबून खून केला आणि नंतर ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली. मंगळवारी (6 डिसेंबर) पोलिसांना एक अज्ञात मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीला आलं. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अमरोहा इथला रहिवासी असलेल्या अन्वर आणि रुखसारचं (वय 30 वर्षं) 2013मध्ये लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलं आहेत. अन्वर हा घराच्या तळमजल्यावर बेकरी चालवतो. त्याचं कुटुंब पहिल्या मजल्यावर राहतं.‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद अन्वरने पोलिसांसमोर दिलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे. त्यानं सांगितलं, की त्याने सोमवारी रात्री पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले. काही काळानंतर, त्याला पुन्हा शरीरसंबंध ठेवायचे होते; पण पत्नीने नकार दिला. रागाच्या भरात अन्वरने दोरीने गळा दाबून पत्नीचा खून केला. नंतर पॉलिथिनच्या गोणीत तिचा मृतदेह बांधून घरापासून 50 किलोमीटर अंतरावर फेकून दिला. त्याच दिवशी त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसांत दाखल केली. हेही वाचा : अमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, देहविक्री कर पण पैसे आण नवभारत टाइम्समधल्या वृत्तानुसार, अन्वर गेल्या कित्येक दिवसांपासून रुखसारच्या वर्तणुकीवर नाराज होता. सोमवारी तिने दुसऱ्यांदा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याची संधी साधून त्याने तिला जिवे मारलं. मंगळवारी ठाकूरद्वारातल्या रतुपुरा गावाजवळ पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला. ठाकूरद्वारा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान मृतदेहाची छायाचित्रं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आली. अमरोहा येथे दाखल झालेल्या बेपत्ता महिलेच्या तक्रारीशी मृतदेहाचे तपशील जुळल्यानंतर मुरादाबाद पोलिसांनी अन्वरला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. चौकशीदरम्यान त्याला भावना अनावर झाल्या आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.