जयपूर, 13 मार्च : सोशल मीडियावर (Social Media) विविध पोजमधील सेल्फी (Selfie) अपलोड करण्याची क्रेझ अनेकदा जीवघेणी ठरू शकते. अशीच एक दुर्घटना राजस्थानमधील (Rajasthan News) धौलपूर येथून समोर आली आहे. येथे एका कॉलेज विद्यार्थ्याची सेल्फी घेताना जीव गेला. मृत्यूनंतर कुटुंबीय गुपचूपपणे त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार होते, मात्र पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर मृतदेह जप्त करण्यात आला. यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. ही घटना धौलपूर जिल्ह्यातील उमरेह गावातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, रामबिलास मीणाचा मुलगा सचिन मीणा (19) रविवारी सकाळी घराजवळील शेतात अवैध देशी बंदुकीसह (कट्टा) सेल्फी घेत होता. यादरम्यान मोबाइलवर क्लिक होण्याऐवजी दुसऱ्या हातात असलेली देशी बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला. डोक्यावर लावलेल्या बंदुकीत फायर झाल्यानंतर डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. हे ही वाचा- दारूच्या व्यसनापायी नातीही विसरला; मोठ्या बहिणीच्या कुटुंबाला आयुष्यभराची शिक्षा गुपचूप घेऊन जात होते मृतदेह…पोलिसांनी मध्येच थांबवलं… डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने मृतदेह कोणत्याही कायदेशीर कारवाई शिवाय घरी घेऊन जात होते. यादरम्यान पोलिसांना सूचना मिळाली आणि पोलिसांनी रस्त्यात बॉडी घेऊन जाणारं वाहन रोखलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सरकारी रुग्णालयाच्या मॉर्च्यूरीमध्ये ठेवला. कुटुंबीयांनी सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे. पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात येणार आहे. याशिवाय अवैध हत्यारांबाबत पोलीस तपास करणार असल्याचं समोर आलं आहे.