ठाणे, 16 जुलै : एका विशिष्ट गाडीचेच सायलेन्सर (Silencer) काढून नेणारी आणि त्याचा काळाबाजार (Black market) करणारी टोळी ठाणे पोलिसांनी (Thane Police) गजाआड केली आहे. चार जणांची ही टोळी केवळ मारुती सुझुकी कंपनीच्या इको (Maruti Suzuki Eco) गाडीचे सायलेन्सर चोरून नेत असे. ठाणे पोलिसांना यामागच्या कारणांचा उलगडा होत नव्हता. गाडीचे इतर पार्ट चोरून नेणं शक्य असताना केवळ सायलेन्सरचीच चोरी का होते, हा प्रश्न पोलिसांना पडला होता. अशी व्हायची चोरी हे चौघे इको गाडीचे सायलेन्सर चोरायचे आणि बाजारात त्यांची विक्री करून पैसा कमवायचे. पण हे केवळ सायलेन्सर का काढतात, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. मग पोलिसांच्या हे लक्षात आलं की गाडीच्या सायलेन्सरमध्ये एका पोकळीत दोन्ही बाजूला लावलेल्या जाळ्यांत मातीमिश्रित प्लॅटिनम धातू असतो. हा धातू मातीतून शोधून काढायचा आणि तो वितळवून बाजारात विकायचा अशी मोडस ऑपरेंडी या टोळीची होती. लाखोंची कमाई एका गाडीच्या सायलेन्सरमधून किमान दहा ते पंधरा ग्रॅम प्लॅटिनम काढलं जायचं. त्याची बाजारातील किंमत जवळपास ३० हजार रुपये आहे. सायलेन्सर काढल्यावंतर बनावट जाळी लावून प्लॅटिनम नसलेली माती पुन्हा सायलेन्सरमध्ये भरून त्या सायलेन्सरला पॉलिश करून अगदी नवीन वाटतील असे सायलेन्सर पुन्हा बाजारात विकात असत. या सर्व गौडबंगालातून ही टोळी महिन्याला वीस ते पंचवीस लाख रुपये कमवत होती. हे वाचा -
घ्रृणास्पद! या देशात स्वच्छ पाण्यासाठी महिलांना करावं लागतंय सेक्स
इको गाडीच कशासाठी? इको गाडीचं इंजिन हे गाडीच्या खालच्या बाजूला आणि तेही मधल्या भागात असतं. शिवाय या गाडीखाली जाणं अगदी सोपं आहे. हा सायलेन्सर काढण्यासाठी चोरांना एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागत असे. पोलिसांनी हा कारनामा उघडकीला आणला असून ही गाडी वापरणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. चोरांपासून सावध राहा आणि काळ्या बाजारातून सायलेन्सर विकत घेऊ नका, असा सल्ला पोलीस देत आहेत.