भोपाळ, 10 जानेवारी: मिशांमुळे (Moustache) नोकरीवरून निलंबित (Suspend) करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) राकेश राणा (Rakesh Rana) यांना पुन्हा एकदा नोकरीत (Suspension cancelled) रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वरिष्ठांच्या नाकावर टिच्चून ते आता नोकरीवर रुजू होणार आहेत. राणा यांनी आपले केस कमी करावेत आणि मिशी योग्य प्रमाणात कमी करत पोलीस दलाची शिस्त पाळावी, असे आदेश त्यांना वरिष्ठांनी दिले होते. मात्र त्याचं पालन करायला नकार दिल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मिशीमुळे राजकीय हादरे मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये पोलीस कॉन्स्टेबल राकेश राणा यांना नोकरीवरून निलंबित केल्यानंतर त्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले होते. त्यामुळे या प्रकरणात सारवासारव करण्याची वेळ गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यावर आली. निलंबनाचे आदेश तातडीनं माघारी घेत राणा यांना कर्तव्यावर हजर होण्यास सांगण्यात आलं होतं. मिशीवरून पोलीस कॉन्स्टेबलला नोकरी गमवावी लागल्याचं लांछन आपल्यावर येऊ नये, यासाठीच सरकारी पातळीवरून वेगाने हालचाली झाल्या आणि काही तासांतच राणा यांचं निलंबन मागे घेण्यात आलं. काय आहे प्रकरण? मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये कॉन्स्टेबल राकेश राणा हे विशेष पोलीस महासंचालकांच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. राकेश यांचे केस प्रमाणाबाहेर वाढले असून त्यांच्या मिशीची स्टाईल ही पोलीस दलातील निकष ओलांडणारी असल्याचं विशेष पोलीस महासंचालकांना वाटलं. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर राकेश यांनी केस आणि दाढी काढून टाकावी, त्याचप्रमाणं योग्य प्रकारे मिशी ठेवावी, असे आदेश त्यांनी दिले. या आदेशाचं राकेश यांच्याकडून पालन होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र घडलं भलतंच. राकेश यांनी दिला नकार काही दिवसांनी राकेश यांची पुन्हा त्यांच्या वरिष्ठांसोबत भेट झाली. त्यावेळी राकेश यांनी केस आणि दाढी तशीच ठेवली असून आपल्या आदेशाचं पालन केलं नसल्याचं लक्षात आलं. याबाबत राकेश यांना विचारणा केली असता त्यांनी अजब उत्तर दिलं. काहीही झालं तरी आपण आपली मिशी कमी करणार नाही आणि आपल्या स्टाईलमध्ये कुठलाही बदल करणार नाही, असं बाणेदार उत्तर त्यांनी दिलं. मात्र ही बाब पोलीस दलाच्या शिस्तीत बसणारी नव्हती. मात्र आता ही कारवाई मागे घेण्यात आली असून राकेश राणा मिशीवर ताव मारत पुन्हा कर्तव्यावर हजर होणार आहेत.