पाटना, 29 सप्टेंबर : क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून अमानुषपणे मारहाण करण्याचे आणि त्यात विद्यार्थी जखमी होण्याचे किंवा त्यांचा मृत्यू होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात अनेकदा दिसून आले आहेत. बिहारमध्ये नुकतीच अशा प्रकारची एक घटना घडली. या घटनेत सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांतली ही दुसरी घटना असल्याने पालक संतप्त झाले आहेत. याप्रकरणी मृत मुलाच्या नातेवाईकांनी शाळेवर मारहाण आणि हत्येचा आरोप केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. `दैनिक भास्कर`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. बिहारमधल्या गया इथल्या वजीरगंज-फतेहपूर रोडवरच्या बहडी बिगहा गावाजवळच्या लिटल लीडर्स पब्लिक स्कूलमधल्या एका शिक्षकाने गृहपाठ केला नाही म्हणून एका विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली. यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. विवेककुमार (वय 6) असं या विद्यार्थ्यांचं नाव असून तो इयत्ता तिसरीत शिकत होता. शाळेच्या वसतिगृहात राहून तो शिक्षण घेत होता. या मारहाणीत विवेक कुमारचा मृत्यू झाला आहे. घरापासून शाळा तीन किलोमीटर दूर असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला वसतिगृहात ठेवलं होतं. लिव्ह इन रिलेशनशिपनंतर शुभमंगल सावधान, एका नात्यामुळे तरुणाचा भयावह शेवट शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विवेकचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. विवेकचे आजोबा रामबालक प्रसाद यांनी मारहाण करून मुलाची हत्या केल्याचा ठपका शाळेवार ठेवला आहे. ते म्हणाले, `यापूर्वीही मारहाणीसंदर्भात तक्रारी आल्या होत्या; पण असा प्रकार पुन्हा होणार नाही, असं शाळेनं सांगितलं. त्यानंतर सर्व काही ठीक चाललं होतं. शिक्षक विकास कुमार सिंग यांनी माझा नातू विवेक कुमारला मारहाण केली आणि त्याला शाळेबाहेर काढलं. शाळेबाहेर काही अंतरावर तो काही तास बेशुद्धावस्थेत पडून होता. यादरम्यान माझ्या उखडा गावात राहणारा बंटी राजवंशी त्या मार्गाने जात असताना, त्याला रस्त्याच्या कडेला विवेक पडल्याचं दिसलं. तो त्याला उचलून घरी घेऊन आला. त्यानंतर आम्ही त्याला पहिल्यांदा शाळेत आणि नंतर पोलीस ठाण्यात घेऊन गेलो. पोलिसांनी आम्हाला सर्वप्रथम त्याच्यावर उपचार करण्याचा सल्ला दिला. आम्ही विवेकला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.` वजीरगंज `सीएचसी`चे डॉ. रविशंकर कुमार म्हणाले, `विवेक रुग्णालयात आला तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या शरीराचा वरील भाग पूर्णपणे सुजलेला होता. त्याच्या कुटुंबीयांनी बाहेरही काही उपचार केल्याचं सांगितलं. प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने `एएनएमसीएच`मध्ये रेफर करण्यात आलं.` पोलीस ठाण्याचे प्रमुख रामएकबाल प्रसाद यादव म्हणाले, `मुलाला अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.` दरम्यान, विवेकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी शाळेबाहेर गोंधळ घातला. पोलिसांनी बुधवारी (28 सप्टेंबर) रात्री शाळेचे संचालक विकास सिंह यांना अटक केली आहे. तसंच कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर शाळा बंद करण्यात आली असून, वसतिगृहातल्या सर्व मुलांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे. गयामधल्या खासगी शाळेतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी जी. डी. गोएंका स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कृष्ण प्रकाश या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. 16 फेब्रुवारीला संशयास्पद परिस्थितीत झालेल्या या मृत्यूच्या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात कृष्ण दुपारी 2.52 वाजता अन्य मुलांसोबत शाळेच्या पायऱ्या उतरताना दिसला. त्यावेळी तो व्यवस्थित दिसत होता. यानंतर आठ मिनिटांनी काही मुलांनी त्याला बेशुद्धावस्थेत बस कॉरिडॉरमधून शाळेत उचलून आणलं आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या आठ मिनिटांत नेमकं काय घडलं या रहस्याची उकल अद्याप झालेली नाही. कृष्ण प्रकाशचे वडील प्रकाश चंद्र यांनी आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. तसंच व्हिसेरा अहवालातला सल्फासचा मुद्दा पूर्णपणे नाकारला आहे. या प्रकरणी चाकंद पोलिस ठाण्यात शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध हत्येशी संबंधित कलम लावून एफआयआर नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. अशाच आणखी एका घटनेत पाटण्यात एका शिक्षकाने पाच वर्षांच्या एका विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. अभ्यास न केल्याने कोचिंग क्लासच्या शिक्षकाने त्याला प्रथम काठीने मारहाण केली. मारहाणीत काठीची एक बाजू तुटली. नंतर शिक्षकाने त्याला काठीच्या दुसऱ्या बाजूने मारहाण केली. तसंच त्याला लाथा-बुक्क्यांनीदेखील मारहाण केली. मारहाण करताना तो मुलगा जमिनीवर कोसळला, तरीदेखील शिक्षक त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत होता. लहान मुलगा ओरडत शिक्षकाकडे ‘मारू नका’ अशी विनंती करत होता. अखेरीस मारहाणीमुळे तो मुलगा बेशुद्ध पडला.