मुंबई, 25 नोव्हेंबर : देशाला हादरवूरन टाकणाऱ्या मुंबईमधील शक्ती मिल सामूहिक बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज आपला अंतिम निर्णय सुनावला. हायकोर्टानं या प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द करत या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं आहे. विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, अशी या आरोपींची नावे आहेत. शक्ती मिल प्रकरणाच्या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आरोपी पॉर्न पाहून आपली वासनी शमवण्यासाठी शिकार शोधत असे. यापूर्वीही त्यांनी अशाच एका मुलीला आपल्या वासनेची शिकार केली होती. त्या दिवशी नेमकं काय घडलं? महिला पत्रकार वासनेची शिकार ही घटना 22 ऑगस्ट 2013 ची आहे, या दिवशी एक महिला फोटो पत्रकार आपल्या सहकाऱ्यासह शक्ती मिल्स परिसर कव्हर करण्यासाठी गेल्या होत्या. महालक्ष्मी परिसरात असलेली ही गिरणी अनेक वर्षांपासून बंद असल्याने तिथं चिटपाखरूही फिरकत नव्हतं. त्या दिवशी संध्याकाळचे 6 वाजले होते. महिला पत्रकार आणि तिची साथीदार तिथं पोहोचल्यावर काही लोकांनी पोलीस असल्याची बतावणी करत त्यांना फोटो काढण्यापासून रोखले. ते लोक म्हणाले की आधी तुम्ही आमच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्या आणि मग फोटो काढा. त्यानंतर त्यांनी महिला पत्रकार आणि तिच्या साथीदाराला आत घेऊन गेले. आत गेल्यानंतर दोघांवरही हल्ला करून महिला पत्रकाराच्या साथीदाराला तिथचं बांधून ठेवलं. पोलिसांनी 72 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर महिला पत्रकारावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. दोन तासांनंतर दोघेही कसेबसे जीव वाचवून रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयातील डॉक्टरांना मुलीची स्थिती पाहताच त्यांना संपूर्ण प्रकरण समजले. डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी ऐकून पोलीसही चक्रावून गेले. त्यानंतर लगेचच अनेक पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. 72 तासांत पोलिसांनी पाचही आरोपींना पकडले. चौकशीदरम्यान आणखी एक सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले. यातील तीन आरोपींनी शक्ती मिलमध्येच सामूहिक बलात्काराची दुसरी घटना घडवली होती. शक्ती मिल गँगरेप प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय शक्ती मिलमधील आणखी एक क्रौर्य समोर या आरोपींना अटक केल्यानंतर काही दिवसांनी कॉल सेंटरमध्ये काम करणारी टेलिफोन ऑपरेटर पुढे आली आणि तिने यातील तीन तरुणांवर तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. 31 जुलै 2013 रोजी शक्ती मिल परिसरातच यातील तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. त्यादरम्यान तिला मारहाणही करण्यात आली होती. या दोन्ही सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये अटक केलेल्या पाच आरोपींविरुद्ध 362 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या दोन्ही सामूहिक बलात्कार प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पीडितांच्या वतीने युक्तिवाद केला, त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले. आरोपी पॉर्न चित्रपट पाहून पीडितेचा शोध घेत असत अटक आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबानीवरून हे सर्वजण सेक्ससाठी वेडे होते. आपली वासना शमवण्यासाठी शिकार शोधत असायचे. मदनपुरा, भायखळा आणि आग्रीपाडा येथे नियमितपणे पॉर्न फिल्म पाहत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले होते. याशिवाय रेड लाईट एरियात त्यांचे जाणं-येणं होते. आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाने चौकशीदरम्यान सांगितले की, ते अनेकदा पॉर्न पाहण्यासाठी जात असत. बलात्कारानंतर पावभाजी खाल्ली पत्रकारावर सामूहिक बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी घरी परतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हात. उलट त्याने त्या रात्री पावभाजीचा आस्वाद घेतला. काही तासांपूर्वी त्याने एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे त्याच्या वागण्यातून अजिबात वाटत नव्हते. कोंबडी कापून पैसे कमावणाऱ्या या 16 वर्षीय मुलाने आजी आणि भावासोबत पावभाजी खाल्ली आणि झोपी गेला. फाशीचं जन्मठेपेत रुपांतर मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आव्हान दिलं होतं. जे कोर्टानं 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं. त्यानंतर ही शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे पार पडली. राज्य सरकारनं या खटल्यासाठी अॅड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी या निकालाचं वाचन केलं.