पुणे: 20 फुट उंच झाडावर कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, अंधश्रद्धेतून बळी?
पिंपरी चिंचवड, 30 मार्च : एका महिलेचा मृतदेह झाडावर (woman dead body on tree) आढळल्याने पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनच्या (Hinjawadi Police Station) हद्दीत मान गावच्या शेजारी असलेल्या माणगावच्या शेजारी असलेल्या मुळा नदीच्या काठावर हा प्रकार घडला आहे. याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash) यांना माहिती मिळताच ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि हा प्रकार उघडकीस आला. या संपूर्ण प्रकरणात बाबत माहिती देताना कृष्णप्रकाश यांनी हा घातपाताचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मात्र महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्वरूपात असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. वीस फूट उंच झाडावर मृतदेह कोणी आणि कसा नेला असेल? हा मोठा प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहे. दुसरीकडे ज्या झाडावर हा मृतदेह ठेवण्यात आला ते झाड उंबराच असल्याने हा घातपात नसून अंधश्रद्धेपोटी एखाद्या महिलेचा बळी दिला गेला असावा अशीही शक्यता वर्तवली जातेय. उंबराच्या झाडाखाली वेगवेगळ्या अघोरी पूजा केल्याचे अनेक प्रकार या आधी वेगवगेळ्या ठिकाणी समोर आले होते. त्यामुळे नेमका हा घातपात आहे की बळी? याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. वाचा : ‘साधू नव्हे सैतान’, जबरदस्तीनं दारू पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार… हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या संपूर्ण परिसराची माहिती घेत, श्वानपथकाला पाचारण केल असून संबधित घटने संबधी कायदेशीर नोंद केली आहे. दरम्यान हिंजवडीचा परिसर ग्रामीण क्षेत्र असलं तरी तिथे आयटी कंपन्या अधिक आहेत आणि त्यामुळे परिसरात राहणाऱ्या अभियंत्याच्या संख्याही मोठी आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने मागील काही महिन्यात हिंजवडी आणि परिसरातील किती महिला तरुणी बेपत्ता आहेत याची माहिती संकलित करून आधी त्या दृष्टीने तपास केला जाणार आहे. सध्या मृतदेह झाडावरून काढून तो वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला जाणारं असल्याची माहिती आयुक्त प्रकाश यांनी दिली आहे. महिलेचा मृतदेह झाडावर नेण्या मागची काय कारणं असू शकतात याबद्दल पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत.