पुणे, 14 ऑक्टोबर : दिवसेंदिवस सोशल मिडीयाचा वापर वाढत चाललाय. अगदी लहान मुलं देखील मोबाईल फ्रेंडली झाली आहेत. युट्युबसारखं प्लॅटफॉर्म त्यांच्या अगदी हातचं झालंय. किशोरवयीन मुलांबद्दल सांगायचं तर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपसारख्या चॅटींग अॅप्सकडे त्यांचा कल वाढलेला दिसतोय. मात्र हेच टेक्नॉलॉजी फ्रेंडली होणं त्यांच्या जिवावर बेतत असल्याचं सध्या दिसतंय. ऑनलाईन फ्रेंड्स बनवण्याच्या प्रयत्नात तरूण ऑनलाईन फ्रॉडर्सच्या विळख्यात सापडतायेत आणि काही घटना आत्महत्येपर्यंतच्या टोकाला जातायेत. हनी ट्रॅप, मॉर्फिंग, अलीकडील लोन अॅप ट्रॅपनंतर आता सेक्स्टॉर्शनच्या आहारी जात तरूण आपलं आयुष्य संपवण्याच्या बातम्या ऐकू यायला लागल्या आहेत. ताज्या घटनेतून या प्रकरणाचं गांभीर्य सांगायचं तर पुण्यात एका १९ वर्षीय तरूणाने सेक्स्टॉर्शनमुळे केलेली आत्महत्या. पुण्याच्या दत्तवाडी इथे राहणारा आणि B.Com चं शिक्षण घेणारा शंतनू वाडकर नावाचा मुलगा. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रीत यादव नावाच्या एका अनोळखी मुलीशी तो चॅट करत होता. पण त्यांची ही ओळख इतकी वाढली होती की शंतनूचे अर्धनग्न फोटो प्रीत यादव नावाच्या आयडीपर्यंत पोहोचले होते. तेच फोटो नंतर व्हायरल करण्याची धमकी मुलीने दिल्याने तरुणाने २८ सप्टेंबरला इमारतीवरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. Pune Sextortion Case : ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ न्यूड व्हिडीओ कॉलचा पुण्यात आणखी एक ब ळी म्हणून नक्की काय असतं हे सेक्स्टॉर्शन ? कोणते लोक याला जास्त बळी पडत आहेत ? आत्महत्येची आकडेवारी नक्की काय सांगतेय ? आणि अशात काय दक्षता घ्यायला हवी? जाणून घेऊया… सेक्स्टॉर्शन म्हणजे काय ? सेक्स्टॉर्शन हा सोशल मीडियामार्फत होणारा लैंगिक शोषणाचा एक प्रकार आहे. चॅटिंगशी संबंधित वेगवेगळ्या सोशल मीडियाचा यात वापर केला जातो. मुलीच्या नावाने एखादी बनावट प्रोफाइल तयार केली जाते. त्या प्रोफाईलवरून अनोळखी लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. एकदा का फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली की त्यानंतर चॅटिंग सुरु करून घट्ट मैत्री करण्याचा प्रयत्न केला जातो. मोबाईल क्रमांक मिळवला जातो आणि त्यानंतर चॅटिंगचं रूपांतर व्हिडीओ कॉलमध्ये केलं जात. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मादक अदा दाखवून तरुणांना भुरळ पडण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतः नग्न होऊन समोरच्या व्यक्तीला देखील कपडे काढण्यासाठी प्रोत्साहित केलं जात. ऑनलाइन सेक्ससाठी तरुणांना विचारणा केली जाते. नग्न तरुणी बघितल्यानंतर अनेकदा तरुण आपले कपडे उतरवण्यास तयार होतात आणि तरुण नग्न झाल्यानंतर नकळत व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो, फोटोही काढले जातात. चोरट्यांचा नवा फंडा; Instagram वर आली एक लिंक अन् पुण्यात उच्चशिक्षित तरुणीला लाखोंचा गंडा एकदा का त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड झाले की त्यानंतर सुरु होते ऑनलाइन ब्लॅकमेलींग. संबंधित तरुणांना त्यांचेच नग्न फोटो, व्हिडीओ पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं धमकी सत्र सुरु होत. या ब्लॅकमेलिंगमध्ये व्हिडिओ इंटरनेटवर किंवा जवळच्या मित्रांना पाठवले जाण्याची धमकी दिली जाते. जर व्हिडीओ व्हायरल होऊ द्यायचा नसेल तर पैशांची मागणी केली जाते. शक्य होईल तितके पैसे उकलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा या सर्व प्रकाराला ‘सेक्स्टॉर्शन’ म्हणतात. यासर्वांमध्ये मानसिक ताण तरुणांवर पडतो. पैसे देण्याची त्यांची क्षमता संपली की तरुण व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने आत्महत्येपर्यंत पोहोचतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे. कोणते लोक याला जास्त बळी पडत आहेत ? या सगळ्यासाठी वयाची मर्यादा नाही. सोशल मीडिया वापरणाऱ्या कोणालाही अशा प्रकारे फसवलं जाऊ शकतं. चॅटिंग अॅप्स, डेटिंग अॅप्समध्ये ‘तरुण’ मोठ्या प्रमाणावर गुंतले असतात. त्यामुळे त्यांनाच या सगळ्यासाठी लक्ष केलं जातं. आयुष्यात एकटेपणा ज्यांना जाणवतो ते लोक सेक्स्टॉर्शनला जास्त प्रमाणात बळी पडत असल्याचं एका माहितीतून समोर आलं आहे. वैवाहिक जीवनात जर काही कलह असतील, आपल्या जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण होत नसतील, कमी वयात घटस्फोट होऊन एकटेपणा आला असेल तर असे लोक सेक्स्टॉर्शनच्या आहारी जातात. तर तरुण आणि किशोरवयीन मुलांना सेक्सबद्दल असलेलं अप्रूप त्यांना या गोष्टीकडे आकर्षित करतं आणि ते सेक्स्टॉर्शनचे बळी पडतात. आत्महत्येची आकडेवारी नक्की काय सांगतेय ? सेक्स्टॉर्शनमुळे आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं पोलिसांच्या अहवालातून उघडकीस आलं आहे. १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत म्हणजेच यावर्षातील दहा महिन्यांत केवळ पुण्यात जवळपास १,४४५ लोक सेक्स्टॉर्शनच्या विळख्यात अडकले आहेत.
महिन्याकाठीची सरासरी काढली तर हा आकडा १२५ च्या आसपास जातो. अशात काय दक्षता घ्यायला हवी? सेक्स्टॉर्शनचं बळी न पडणं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. सर्वप्रथन तर जर एखाद्या अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती पडताळणी केल्याशिवाय स्वीकारू नका. आपला मोबाईल नंबर त्यांना शेअर करू नका. अनोळखी व्यक्तींचे व्हिडीओ कॉल स्वीकारणं पूर्णतः टाळा. कुणी अशाप्रकारे तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर सर्वप्रथम जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा. पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम सेलमध्येही औपचारिक तक्रार नोंदवा. अशा गुन्हेगारांना (IPC) कलम २९२ नुसार अश्लील साहीत्य प्रकाशित करण्याच्या गुन्ह्याखाली २ वर्षाची शिक्षा होऊ शकते. इथे आपली बदनामी होईल, हा विचार करू नका कारण जर कोणी तुमचा असा व्हिडिओ बनवला तर तुम्ही गुन्हेगार नसून व्हिडिओ बनवणारा गुन्हेगार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरण्याऐवजी सामोरं जा आणि सायबर गुन्ह्यांबाबत जागृत व्हा.